काटी,दि.१९ : 

तुळजापूर तालुक्यातील तामलवाडी गणाचे पंचायत समिती सदस्य दत्ता शिंदे यांनी ग्रामपंचायत निवडणुकी दरम्यान तामलवाडी पंचायत समिती  गणातील बिनविरोध ग्रामपंचायत काढल्यास 5 लाखाचा विकास निधी देणार असे आवाहन केले होते. 
या बाबत तुळजापूर लाईव्हवर 27 डिसेंबर 2020 रोजी ग्रामपंचायत निवडणूका बिनविरोध होण्यासाठी तामलवाडीचे पं.स. सदस्य शिंदे सरसावले; बिनविरोध ग्रामपंचायतीस पाच लाख विकास निधी देणार  या शिर्षकाखाली वृत्तही प्रसिद्ध केले होते. 

या आवाहनाला प्रतिसाद देत तामलवाडी पंचायत समिती गणातील पिंपळा (खुर्द) या गावातील नागरिकांनी एकत्रित येऊन येथील ग्रामपंचायत निवडणूक सर्वानुमते बिनविरोध काढली. 
 लहानपणापासून समाजकार्याची आवड असलेले तामलवाडी पंचायत समिती सदस्य दत्ता शिंदे हे आपल्या गणातील गावात विविध समाजोपयोगी उपक्रम राबवित असतात. त्याच प्रमाणे सामाजिक बांधिलकी जपत गणातील ग्रामपंचायत   बिनविरोध काढण्यासंदर्भात दिलेला शब्द पाळत शिंदे यांनी पंचायत समितीच्या  15 व्या वित्त आयोगातील विकास निधी पिंपळा (खुर्द) या गावातील वेशीपासून ते ओढ्यापर्यंत बंदिस्त गटार या कामासाठी वर्ग केला. यामुळे गावाच्या प्रवेश द्वारासमोर होत असलेल्या घाणीचे साम्राज्य   कमी होणार आहे. त्याचप्रमाणे
येथील महादेव मंदिरासमोर हायमास्ट लॅम्पसाठी निधी मंजूर करून दिला आहे . त्यामुळे मंदिरा समोरील परिसर प्रकाशमय होणार आहे. यापूर्वीही पंचायत  समिती सदस्य दत्ता शिंदे यांनी भारतीय जैन संघटना व महाराष्ट्र शासन यांच्या मार्फ़त राबवण्यात आलेल्या नाला खोलीकरण कामासाठी पाठपुरावा करून पिंपळा (खुर्द) येथील तानाजी पाटील यांचे शेत ते संजय कदम यांचे शेत यामध्ये जाणाऱ्या 1.5 किलोमीटर तसेच तुकाराम धनके यांचे शेत ते पाटील यांचे असे एक किलोमीटर ओढ्याचे खोलीकरण करून घेतले. त्यामुळे ओढ्यात भरपूर पाणी साठून शेतकऱ्यांना या खोलीकरणाचा फायदा होत असून त्यांच्या या कामाबद्दल नागरिकांमधून कौतुक होत आहे.
 
Top