तुळजापूर, दि. २६ : डॉ. सतीश महामुनी

देश आणि राज्य सर्व बाजूंनी अडचणीतून वाटचाल करत असताना महाराष्ट्रातील  आघाडी सरकार सर्व पातळीवर अपयशी ठरले आहे, असा आरोप भारतीय जनता युवा मोर्चा शहर उपाध्यक्ष प्रसाद पानपुडे यांनी केला आहे.

राज्यात सत्तेवर असलेले शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस या तीन पक्षाचे हे सरकार जनतेला कोणत्याही कामामध्ये सहकार्य करताना दिसत नाही. कोणत्याही प्रमुख मुद्द्यावर सरकारने कायम स्वरूपी अपयशाची भूमिका स्वीकारलेली आहे. मराठा आरक्षण, ओबीसी राजकीय आरक्षण आणि महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासाच्या योजना राबवण्यासाठी निधीची कमतरता हे त्यातील प्रमुख मुद्दे आहेत. तरुण वर्गामध्ये तर हे सरकार राज्यांमध्ये आहे की नाही अशी चर्चा आहे, अशी प्रतिक्रिया युवा मोर्चाचे शहराध्यक्ष प्रसाद पानपुडे यांनी तामलवाडी ता तुळजापूर  येथे ओबीसी समाजाच्या राजकीय आरक्षणाच्या चक्काजाम आंदोलन प्रसंगी माध्यमांशी बोलताना व्यक्त केले .

युवा मोर्चाचे माजी जिल्हा उपाध्यक्ष इंद्रजीत साळुंखे म्हणाले की, महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या कारणांनी लोकांची गर्दी आहे, लोकांनी संसर्गाचा धोका लक्षात घेऊन खबरदारी घेण्याची मानसिकता केली आहे . तरीही सरकारने आजपर्यंत मंदिरे बंद ठेवली आहे. नियमावली लागू करून मंदिरे सुरू करण्याची मागणी सातत्याने होत असताना व मंदिर बंदी मुळे प्रचंड मोठ्या प्रमाणावर आर्थिक कोंडी निर्माण होऊन लोकांची उपासमार होत असताना हे सरकार मात्र या बाबीकडे गांभीर्याने बघत नाही.
 तसेच ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण या सरकारच्या नाकर्तेपणामुळे गेलेले आहे, राज्यामध्ये भाजप सत्तेवर असता तर मराठा आरक्षण आणि ओबीसीचे राजकीय आरक्षण हे मुद्दे ताणले गेले नसते, ते वेळेत सोडविण्यात आले असते अशी प्रतिक्रिया दिली. तामलवाडी येथे तालुक्यातील ग्रामीण भागातील भारतीय जनता पार्टी चे कार्यकर्ते मोठ्या संख्येने आंदोलनासाठी आले होते.
 
Top