कोरोना चा संसर्ग सध्या राज्याच्या सर्वच भागात सुरू आहे. कोरोनामुळे बहुतांशी शेतकऱ्याचा रोजगार बुडाला आहे,अशा परिस्थितीत ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या शेतीला जोड धंदा असलेला दुग्ध व्यवसाय देखील अडचणीत आला आहे. कारण दुधाला मागणी असूनही केवळ योग्य दर मिळत नसल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडल्याचे दिसून येत आहे.
दुभत्या जनावरांचा चारा आणि पशुखाद्य च्या वाढत्या खर्चासाठी नुसती कसरत करण्याची वेळ शेतकऱ्यांवर आल्याचे चित्र परिसरातून दिसून येत आहे. ग्रामीण भागातील आर्थिक कणा मानला जाणारा दुग्धव्यवसाय चार महिन्यापासून कोरोनामुळे विविध संकटांना तोंड देत येथील शेतकरी पशुपालन करत असताना मेटाकुटीस आले आहेत. दुधाच्या समस्येने शेतकऱ्याच्या संकटात आणखीनच भर पडली आहे. जिल्ह्यातील विशेषता तुळजापूर, उमरगा, परंडा, भूम, कळंब ,वाशी या तालुक्यात दुधाचा मोठ्या प्रमाणात व्यवसाय आहे. या व्यवसायामुळे अनेक शेतकरी आर्थिकदृष्ट्या सक्षम आहेत. परंतु, गेल्या चार महिन्यांपासून कोरोनाच्या महामारीने शेतकऱ्यांचे आर्थिक गणित पूर्णतः कोलमडून टाकल्याचे चित्र दिसून येत आहे.
गेल्या तीन ते चार महिन्यापासून दूध उत्पादक शेतकऱ्यांना कोरोनाची मोठ्या प्रमाणात झळ बसत आहे, सध्या बाजारात पशुखाद्याचे दरही गगनाला भिडले आहेत. शेंगाच्या पेंडीचे प्रति क्विंटल 5500 रुपये एवढ्या किमतीला विकले जात आहे. तर सुग्रासचे एक पोते 50 किलोचे तेराशे रुपये ते चौदाशे रुपये एवढ्या किमतीला विकले जात आहे, त्याचप्रमाणे मक्याचा भरडा प्रती 50 किलो ला नऊशे ते हजार रुपये याप्रमाणे विकला जात आहे, गेल्या दोन वर्षात दर गगनाला भिडले आहेत. ओला-सुका या चाऱ्या याबरोबर इतर पशुखाद्य जनरल द्यावे लागते.
परंतु कोरोना च्या पार्श्वभूमीवर ही बाब शेतकरी वर्गाला निश्चित परवडणारी नाही. शेतकरी आर्थिक दृष्ट्या भरडला जात असल्याचे दिसून येत आहे. त्याचप्रमाणे एका गाईला दिवसाला तीन ते चार किलो ओला आणि सुका चारा लागतो, तसेच तेवढेच पशुखाद्य द्यावे लागते, या संपूर्ण खर्चाचा मेळ बसवण्यासाठी नुसती शेतकऱ्यांना कसरत करावी लागते आहे. परंतु त्याचा कोणताही प्रकारचा आर्थिक फायदा शेतकरी बांधवांना मिळत नसल्याने पशुपालक बा़धंवातुन नाराजी व्यक्त होत आहे.