उस्मानाबाद, दि .२६: उमाजी गायकवाड

राज्यातील ओबीसींचं राजकीय आरक्षण रद्द झाल्याच्या निर्णयाविरोधात आज राज्यभरात भाजपने ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण घालवणाऱ्या आघाडी सरकारच्या नाकर्त्या कारभाराच्या विरोधात चक्काजाम आंदोलन केले.  

त्याच पार्श्वभूमीवर उस्मानाबाद जिल्हयातील तामलवाडी टोल नाका - येडशी टोल नाका येथे तुळजापूर तालुक्याचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या नेतृत्वाखाली चक्काजाम आंदोलन करण्यात आले. तामलवाडी व येडशी टोलनाक्यावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.

 राज्य सरकारच्या तानाशाहीला आम्ही घाबरत नाही, जोपर्यंत ओबीसी आणि मराठा बांधवांवर होणारा अन्याय दूर केला जात नाही, तोपर्यंत आता आम्ही मागे हटणार नाही, मागास आयोगाच्या माध्यमातून तात्काळ कालबद्ध कार्यक्रम जाहीर व्हावा, ओबीसी समाजाचे आरक्षण पूर्ववत करावे तसेच ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत , त्या आरक्षणाचा प्रश्न निकाली लागेपर्यंत घेण्यात येऊ नयेत, या मागण्यांसाठी हे आंदोलन आम्ही करीत आहोत, असे आ. पाटील बोलताना  म्हणाले. 


पुढे बोलताना ते म्हणाले की, राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडी सरकार ओबीसी आरक्षण कायम ठेवण्यात सपशेल अपयशी ठरले असून आरक्षण रद्द करुन ओबीसी, मराठासह सर्व समाजाला आरक्षणापासून वंचित ठेवण्याचा प्रयत्न करत असल्याचा घणाघात आमदार पाटील यांनी यावेळी केला असून राज्यातील निष्क्रिय सरकारच्या कार्यपद्धतीचा खरपूस समाचार घेताना मागास आयोग व ईपेरिकेल डाटा याची अंमलबजावणी करावी अन्यथा भारतीय जनता पक्षाच्या आक्रोशाला सामोरे जावे लागेल असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.

या आंदोलनात भाजपचे तालुकाध्यक्ष संतोष बोबडे, माजी तालुकाध्यक्ष प्रभाकर मुळे,भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष विक्रमसिंह देशमुख,आनंद कंदले, नारायण नन्नवरे, सुहास साळुंके, विजय शिंगाडे, शिवाजी बोधले, दत्ता राजमाने, बापू कणे, वसंत वडगावे, विष्णू  वाघमारे, प्रशांत लोमटे, प्रशांत मुळे, अनिल मुळे, शरद जमदाडे, फिरोज मुजावर, भिवा इंगोले, ज्ञानेश्वर बोधणे, पंचायत समितीचे माजी उपसभापती चित्तरंजन सरडे,गुलचंद व्यवहारे, पंचायत समिती सदस्य दत्ता शिंदे, इंद्रजित साळुंके, साहेबराव घुगे, प्रभाकर मुळे, गणेश सोनटक्के, आदेश कोळी, अण्णा लोंढे, जितेंद्र गुंड, सुशांत भूमकर, अरविंद पाटील, महादेव पाटील, बाबा बेटकर, ज्ञानेश्वर गुरव  यांच्या सह इतर पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
 
Top