तुळजापूर, दि. ५ :

तुळजापूर तालुक्यातील सुरतगाव ते काटी या रस्त्याच्या कामांबाबत सावरगाव येथील नागरिकांनी सामुदायिकपणे जिल्हाधिकारी उस्मानाबाद यांच्याकडे लेखी तक्रार केली असून रस्त्याच्या दुतर्फा निकृष्ट काम केले जात आहे. हे काम तात्काळ दर्जेदार न केल्यास काम बंद करू असा इशारा दिला आहे.

सावरगाव येथील चंद्रवर्धन माळी यांनी यासंदर्भात गावातील ग्रामस्थांच्या स्वाक्षरीचे निवेदन जिल्हाधिकारी उस्मानाबाद यांना दिली आहे. तसेच या जिल्ह्याचे खासदार ओमराजे निंबाळकर यांच्याकडेही तक्रार केली आहे. त्यानुसार खासदार ओमराजे निंबाळकर यांनी या कामामध्ये लक्ष घालून सदर काम दर्जेदार करण्यासाठी संबंधिताला सूचना केल्या आहेत.


गेल्या पंधरा वीस वर्षापासून सुरत गाव सावरगाव काटी केमवाडी या रस्त्याची दुरवस्था झालेली आहे खूप मोठ्या प्रमाणावर खड्डे असल्यामुळे या भागातील वाहतूक देखील इतर मार्गाने करावी लागत आहे. या पार्श्वभूमीवर सुरत गाव ते सावरगाव व पुढे काटी पर्यंत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने रस्त्याचे काम करण्यात येत आहे. गेल्या दोन-तीन महिन्यांपासून हे काम चालू आहे. मात्र हे सुरू असलेले काम निकृष्ट दर्जाचे होत आहे, अशी नागरिकांनी तक्रार केली आहे.

यासंदर्भात नागरिकांनी जिल्ह्याचे खासदार ओमराजे निंबाळकर यांच्याकडे दाद मागितली असता त्यांनी जातीने लक्ष घालून हा रस्ता दर्जेदार होण्यासाठी महत्त्वाच्या सूचना केल्या आहेत. तसेच नागरिकांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे अर्ज केल्यामुळे जिल्हाधिकारी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना कोणत्या सूचना करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनावर सुजित हंगरगेकर, कोंडीबा फंड, चंद्रोदय माळी, अकबर शेख, सतीश माने, ओंकार अक्कलकोटे, राम तानवडे, श्रीनाथ थिटे, नागनाथ शिंदे, सागर शिंदे, दशरथ पाटील, सुभाष गोडसे, दादा अक्कलकोटे, राजेंद्र तोडकरी, केदार गाबने, अजिंक्य पाटील ांच्यासह इतर 40 लोकांच्या स्वाक्षर्‍या आहेत
 
Top