नळदुर्ग : एस.के.गायकवाड
शिक्षणाच्या बळावर जीवनात सर्वांनाच यश हवं असतं, प्रत्येक क्षेत्रात सफल व्हावे असे प्रत्येकाला वाटत असते. तेव्हा येणाऱ्या अडथळ्यांना पार करून दुर्दम्य इच्छाशक्ती व आत्मविश्वासाच्या बळावर अभ्यासात सातत्य ठेवल्यास यश निश्चित असल्याचे तहसिलदार सौदागर तांदळे यांनी व्यक्त केले.
नळदुर्ग पोलिस ठाणे येथे मुक्तांगण संवाद विद्यार्थ्यांशी या उपक्रमांतर्गत इयत्ता दहावीच्या गुणवंत विद्यार्थी गुणगौरव सोहळा व करिअर मार्गदर्शन कार्यक्रमात ते बोलत होते.
पोलिसांच्या सामाजिक उपक्रमातून पोलीस, विद्यार्थी, शिक्षक व पालक यांचा सुंदर अनुबंध निर्माण करण्याच्या दृष्टीने मुक्तांगण संवाद विद्यार्थ्यांशी या कार्यक्रमात पोलीस स्टेशनच्या कार्यक्षेत्रातील इयत्ता दहावीमध्ये उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सन्मानपत्र, पुस्तक व पुष्पगुच्छ देवून तहसीलदार सौदागर तांदळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक जगदीश राऊत यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर सहाय्यक पोलीस निरीक्षक अमित मस्के, पोलीस उपनिरीक्षक कैलास लहाने, मुक्तांगणचे समन्वयक भैरवनाथ कानडे आदींची उपस्थिती होती.
दहावीनंतर विद्यार्थ्यांनी नेमकं कोणत्या क्षेत्रात करिअर करावे, शिवाय त्यांना विविध स्पर्धा परीक्षांना सामोरे जायचं असतं परंतु त्यांना यामध्ये येणार्या चढ-उताराची पुरेशी जाणीव नसते यासाठी दहावीनंतर पुढे काय? विद्यार्थ्यांनी मुक्त , निर्भय जगण्यासाठी काय करावं? बाल गुन्हेगारी रोखण्यासाठी संबंधितांनी कोणती खबरदारी घ्यायला हवी, याशिवाय आपले क्षेत्र निवडताना पालकांसोबतचा संवाद ,विद्यार्थ्यांनी आपली क्षमता व कल कसा ओळखावा आणि उपलब्ध असणाऱ्या करिअरच्या विविध संधी क्षेत्रात त्यांनी यशस्वी कसं व्हावं या अनुषंगाने विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक व सामाजिक जाणिवा अधिक प्रगल्भतेसाठी मुक्तांगण संवाद विद्यार्थ्यांशी या कार्यक्रमात भैरवनाथ कानडे यांनी सौदागर तांदळे, जगदीश राऊत , कैलास लहाने,अमित मस्के यांची प्रकट मुलाखत घेतली.
यावेळी आपली इच्छा ,कार्यक्षमता आणि बुद्धिमत्तेच्या जोरावर आपले ध्येय आपण साध्य करू शकतो ,आपले क्षेत्र कोणतेही असो त्यामध्ये आपण प्रामाणिकपणे व आत्मविश्वासाने सातत्य ठेवून कार्यमग्न झाल्यास यशाची कर्तुत्व शिखरे आपणाला पादाक्रांत करता येतात असा विचार उपस्थित मान्यवरांनी मांडला . प्रारंभी सहाय्यक पोलीस निरीक्षक अमित मस्के यांनी विदयार्थ्यांना पोलीस स्टेशनच्या कामकाजाची व शस्त्राची प्रात्यक्षिकासह माहिती दिली.
यावेळी महिला दक्षता कमिटीच्या सुभद्राताई मुळे, कल्पना गायकवाड ,सुजाता चव्हाण ,कस्तुरा कारभारी, शाहेदाबी सय्यद, जिजाबाई जाधव, शिवाय रंजीता कानडे, केशर जाधवर, धनाजी वाघमारे , बालाजी मोकाशे, हरिष जाधव, पांडूरंग पवार,मनोहर घोडके, सत्यवान गायकवाड, लखन वाघमारे, विठ्ठल जाधवर , माणिक कोकणे ,प्रविण गुरव ,महावीर धोंगडे , एस .के गायकवाड, अरुण लोखंडे, आयुब शेख, सतीश राठोड आदीसह विद्यार्थी शिक्षक व पालक उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन भैरवनाथ कानडे यांनी तर आभार सत्यवान गायकवाड यांनी केले.