नळदुर्ग , दि .२७ 

स्वतःच्या पोटच्या तीन मुली पैकी दोन मुलींना उमरगा बस स्थानकावर सोडून गायब होणाऱ्या अणदुर ता. तुळजापूर येथील राठोड  कुटुंबीयांची            येथील  माजी पंचायत समिती सदस्य साहेबराव घुगे यांच्या पुढाकारातून मित्र मंडळाने आज सकाळी प्रत्यक्ष भेट घेऊन विचारपूस करून तिन्ही मुलींची दहावी पर्यंतची शैक्षणिक व आरोग्यविषयक देखभालीची जबाबदारी घेऊन , लागलीच  नवीन कपडे व साहित्य वाटप करून एक आदर्श निर्माण करून माणुसकीचे दर्शन घडवले आहे.      

                           
  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी "बेटी बचाव, बेटी पढाओ" असा संदेश दिला आहे. त्यास अशा कृतीतून बळकटी या मित्र मंडळाने दिलेली आहे. मुली जन्माला आल्या पाहिजेत, त्या वाढल्या पाहिजेत आणि त्या मोठ्या ही झाल्या पाहिजेत  यावर संपूर्ण देशभरात मोठे व्यापक जनजागरण, कार्यक्रमाचे, आयोजन होत असताना अशा घटना अजूनही समाजामध्ये घडत आहेत. अशीच ह्रदय हेलावणारी घटना राठोड पती-पत्नीने नैराश्यातून केल्याचे समोर आले. आपल्या पोटी मुली जन्माला येत आहेत, म्हणून दिनेश मेघा राठोड हा व्यसनाधीन झाला. त्यातूनच त्याने मुली होण्यास तूच जबाबदार म्हणून पत्नी सुनीतास त्रास सुरू केला. याला कंटाळून सुनीतानी  माहेरला जाण्याचा बहाणा करून उमरगा स्थानकावर दि . २४ जुलै रोजी दुपारी तिन्ही मुली सोडून गायब झाली होती. त्यातील दीड वर्षाच्या मुलीने आईचे अंगच न सोडल्याने ती सोबत राहिली, तर १ महिनाची व तीन वर्षाची बबली स्थानकात राहिली होती.                                      .    

 शब्द अपुरे पडत असलेल्या घटनेचा तपास उमरगा, नळदुर्ग पोलिसांनी अत्यंत गतीने केल्याने हे कुटुंब अणदुर पाटील तांडावरचे निघाले. अशा या राठोड कुटुंबीयांची मगंळवारी सकाळी भेट घेऊन अशी घटना पुन्हा घडू नये, या मुलींना वाढवा, मोठे करा त्यासाठीची शैक्षणिक  जबाबदारी साहेबराव घुगे मित्रमंडळाने तर मोफत आरोग्य विषयक देखभाल करण्याची जबाबदारी डॉ.व्यंकटेश घुगे यांनी घेऊन या भेटीदरम्यान तिन्ही बाळांना व आईंस टाॉनिक, खाऊ, फळे,तिन्ही मुलींना नवीन कपडे, शाळेचे साहित्य देऊन सामाजिक बांधिलकी जोपासली आहे.

 यावेळी माजी पंचायत समिती सदस्य साहेबराव घुगे, डॉ. व्यंकटेश घुगे,  शाहूराज मोकाशे, राहुल राठोड, पत्रकार चंद्रकांत गुड्ड, संजय आलुरे, गुंडेशा गोवे, म्हाळाप्पा घोडके, काशिनाथ घुगे, प्रज्योत कर्पे हे यावेळी उपस्थित होते.
 
Top