उस्मानाबाद, दि.13 : 

सामाजिक न्याय विभागातर्फे राबविण्यात येणाऱ्या योजनांची विविध माध्यमांद्वारे प्रसिध्दी केली जाते. अनुसूचित जाती व नवबौध्द घटकातील नागरिकांसाठीच्या योजनांच्या प्रसिध्दीवर यात प्रामुख्याने भर दिला जातो. या चित्ररथांवर सामाजिक न्याय विभागाच्या योजनांचे फ्लेक्स लावण्यात आले असून एलईडी व्हॅनवरही योजनांची माहिती फ्लेक्सद्वारे दाखवण्यात आली आहे. 



एलईडी व्हॅनवर दृकश्राव्य माध्यमांचा वापर करुनही योजनांची माहिती दिली जाणार आहे. आज सकाळी जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी या चित्ररथास आणि एलईडी व्हॅनला हिरवी झेंडी दाखवून मार्गस्थ केले आहे.


हा चित्ररथ जिल्ह्यातील सर्व तालुक्यात 20 दिवस विविध गावांना भेटी देऊन तेथे थांबून माहिती देणार आहे. दररोज किमान 60 ते 70 किमींचा प्रवास करुन प्रतीदिन तीन गावांना भेटी देणार आहे. हा चित्ररथ जिल्ह्यातील 60 गावांमध्ये जाणार आहे. एलईडी व्हॅन जिल्ह्यातील 66 गावांमध्ये जाणार आहे. दररोज दोन-तीन गावांमध्ये जाऊन माहिती देण्याचे काम करण्यात येणार आहे. या चित्ररथ व एलईडी वाहनातून सामाजिक न्याय विभागाच्या योजनांची पुस्तिका व पोष्टर ठेवण्यात आले आहेत. त्याचे वितरणही करण्यात येणार आहे.


येथील जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीने हा उपक्रम राबविण्यात येत आहे. आज सकाळी या दोन्ही व्हॅनला मार्गस्थ करताना निवासी उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी, समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त बी.जी.अरवत, जिल्हा माहिती अधिकारी यशवंत भंडारे आदी उपस्थित होते. या चित्ररथ व एलईडी व्हॅनवरील माहिती घेताना किंवा पाहताना नागरिकांनी कोरोनाच्या प्रतिबंधासाठी राज्यशासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करावे, असे आवाहनही यावेळी करण्यात आले आहे.

 
Top