लोहारा ,दि. ७
लोहारा तहसीलवर महागाईच्या विरोधात एकल महिला संघटनेच्या वतीने धरणे आंदोलन करीत तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले आहे.
गेल्या दोन वर्षांपासून कोरोनाच्या सावटाखाली जीवन जगत असताना व कोरोनाच्या संकटकाळात देखील महागाईने सर्वसामान्य नागरिकांचे पार कंबरडे मोडले आहे.
जिल्ह्यातील उस्मानाबाद, तुळजापूर, लोहारा , परंडा या चार तालुक्यातील ८३ गावातुन आर्थिक सामाजिक, संस्कृतीक, राजकीय , आरोग्यावर तसेच महिलांच्या प्रश्नावर सतत संघटनेच्या जोरावर काम करीत असताना महागाईच्या भस्मासुराने कळस गाठला आहे.
प्रशासनाने प्रत्येक तालुक्यातील वंचित महिलांना रेशन कार्ड, श्रावण बाळ, संजय गांधी, विधवा महिलांना तसेच अपंग व्यक्तींना योजनेतुन मानधन देऊन प्रलंबित कामाचा देखील तात्काळ निपटारा करावे. तसेच गरजु एकल महिलांना घरकुल योजनेचा जास्ती जास्त लाभ देण्यात यावा ,यासाठी तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन करीत तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले.
यावेळी काशीबाई पवार, नौशाद सय्यद, महानंदा चव्हाण, उर्मिला महंकराज, अनिता नवले, अनुराधा अंबुरे, सुवर्णा ननवरे, अश्विनी शेळके, अनुसया सरवदे, जनाबाई काळे, नालंदा सूर्यवंशी, शोभा पाटील, साधना भिसेसह आदी एकल महिला संघटनेचें महिला कार्यकर्ते सहभागी झाले होते.