काटी , दि .७
ग्रामस्थांना पिण्याचे पाणी व अन्य नागरी सुविधा द्याव्यात, यासाठी तुळजापूर तालुक्यातील काटी येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष अशोक जाधव यांच्या नेतृत्वाखाली सुंदर गाव पुरस्कार प्राप्त काटी ग्रामपंचायतवर मंगळवारी हलगी मोर्चा काढून आंदोलन करण्यात आले होते. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने स्थानिक ग्रामपंचायत आणि गटविकास अधिकारी पंचायत समिती तुळजापूर यांना मागणीचे निवेदन देण्यात आले आहे.
दरम्यान येत्या सात दिवसात गावात नियमीतपणे नळ योजनेद्वारे पाणीपुरवठा करावा, पथदिवे, हायमस्ट लॅम्प सुरू करावेत, गटारांची कामे करावीत, गावातील विद्युत पुरवठा सुरळीत करावा, पहाटे पाच ते आठ या काळात होणारी लोडशेडींग बंद करावी, गावात स्वच्छता मोहीम राबवून नागरिकांच्या आरोग्याची दक्षता घ्यावी, कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा संभाव्य धोका ओळखून वेळीच आवश्यक त्या उपाययोजना राबवाव्यात, रस्त्याची दुरूस्ती करावी, ग्रामपंचायतचा 15 वा वित्त आयोग, पाणीपुरवठा नविन कामे करण्यासाठी घेतलेली अनामत, ग्रामनिधीसह विविध विकास कामासाठी आलेल्या निधीचा नियमानुसार विनियोग करावा, खर्चाचा तपशिल जनतेसमोर मांडावा, ग्रामस्थांना मोफत नळ कनेक्शन द्यावे, आदी नागरिकांच्या मागण्यां सात दिवसात पुर्ण कराव्यात अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा अल्टीमेटम राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष अशोक जाधव यांनी ग्रामपंचायत प्रशासनाला दिला आहे.