काटी ,दि .१५ : उमाजी गायकवाड
तुळजापूर तालुक्यातील सावरगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला मागील चार दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे गळती लागली असून प्राथमिक आरोग्य केंद्रातील इमारतीतील समुपदेशन कक्षात, ओपीडी, वैद्यकीय कक्ष दालनासमोर दोन ठिकाणी, पोर्चमध्ये, औषध भांडारसह बहुतांश ठिकाणी गळती लागली आहे.
तीन वर्षांपूर्वी जिल्हा परिषद बांधकाम विभागा अंतर्गत 1 कोटी 88 लाख रुपये खर्चून मोठा गाजावाजा करीत ठेकेदाराकडून येथील प्राथमिक आरोग्य केंद्राची सुसज्ज इमारत बांधण्यात आली. बांधण्यात आलेल्या इमारतीला तीन वर्षांतच पूर्णतः गळती लागल्याने रुग्णांसह येथील डॉक्टर, कर्मचाऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत असून काटी, सावरगाव परिसरात अपघात तसेच आपत्कालीन स्थितीत हे प्राथमिक आरोग्य केंद्र महत्वाची भूमिका बजावत असताना नवीन बांधण्यात आलेल्या इमारतीला तीन वर्षांतच गळती लागल्याने निकृष्ट दर्जाच्या कारणांमुळे लाखों रुपये पाण्यात गेल्याचे ग्रामस्थांमधून चर्चिले जात आहे . त्याचबरोबर रुग्णसेवेवर परिणाम होत असून इमारतीची तात्काळ दुरुस्ती करावी अशी मागणी ग्रामस्थांमधून होत आहे.
सरपंच रामेश्वर आबा तोडकरी
सावरगाव, काटीसह परिसरात अपघात व आपत्कालीन स्थितीत हे प्राथमिक आरोग्य केंद्र 24 गावांतील 41000 हजार ग्रामस्थांना उपचारासाठी आधार ठरत असून 1कोटी 88 लाख रुपये खर्चून बांधण्यात आलेल्या नवीन इमारतीला अल्पावधीतच गळती लागल्याने इमारतीच्या दर्जा बाबत प्रश्न चिन्ह निर्माण झाले असून हे काम निकृष्ट झाल्याचे स्पष्ट होत आहे. गत वर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळेही गळती लागली होती. याबाबत तालुका आरोग्य अधिकारी यांना लेखीपत्र देऊन कळविण्यात आले होते. इमारतीची दुरुस्ती तात्काळ करुन रुग्णांची होणारी हेळसांड त्वरीत थांबवावी.