रेशनमध्ये गैरप्रकार  करणाऱ्या दुकानदारांसह सदस्य, सचिवावर कारवाईची मागणी

नॅशनल दलीत मुव्हमेंट फाॅर जस्टिस संघटनेची तहसिलदारांकडे मागणी

 परंडा , दि . २०
 
परंडा तालुक्यासह उस्मानाबाद जिल्ह्यातील रास्तभाव , शिधावाटप दुकानामध्ये सूचना फलक लावुन दुकानांकडून  जनतेला ग्राहकोपयोगी वस्तुंचे वाटप सुरळीत  होण्याकरीता सर्व दुकाने सकाळी ४ तास व दुपारी ४ तास  उघडी ठेवण्याची मागणी करुन  अंमलबजावणी न करणा-याचे  परवाने निलंबित करण्याची मागणी नॅशनल दलीत मुव्हमेंट फाॅर जस्टिस संघटनेच्या वतीने तहसिलदार परंडा मार्फत उस्मानाबाद  जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनाद्वारे  केली आहे.

        
 दिलेल्या निवेदनात पुढे नमुद केले आहे की ,  सार्वजनिक वितरण व्यवस्थेतंर्गत वितरीत होणाऱ्या विविध ग्राहकोपयोगी वस्तूंना जनतेमध्ये विहित वेळेत वाटप करणे गरजेचे असताना देखील रास्तभाव / शिधावाटप दुकानांकडून सदर वस्तुंचे वेळेवर वाटप होत नाहीत, हे टाळण्यासाठी शासनाने याबाबत संबंधितांना वेळोवेळी शासन निर्णय व परीपत्रके निर्गमित करुन सूचना दिल्या.   रास्तभाव/शिधावाटप दुकाने सकाळी ४ तास व दुपारी ४ तास  उघडी ठेवावे . ज्या गावात आठवडी बाजार भरते, त्याठिकाणी बाजाराच्या दिवशी दुकाने पूर्ण वेळ उघडी ठेवण्यात यावीत, विविध कारखाने/उद्योगधंदे असलेल्या क्षेत्रात त्यांच्या साप्ताहिक सुट्टीच्या दिवशी दुकाने पूर्णवेळ उघडी ठेवण्यात यावीत, जिल्ह्यातील सर्व रास्तभाव दुकानदारांनी खालील बाबी नमूद असलेली सूचना फलकात लक्ष्य निर्धारीत लाभार्थ्यांना वितरीत करण्यात येणाऱ्या अन्नधान्याचे प्रमाण, किरकोळ विक्रीचे मूल्य, अन्नधान्याची पात्रता, रास्तभाव दुकाने उघडणे व बंद करण्याची वेळ, भोजनाची वेळ, अन्नधान्याचा दर्जा आणि प्रमाण, काही तक्रार असल्यास ती कोणत्या अधिकाऱ्याकडे करावी‌ यासाठी टोल फ्री क्रमांक, हेल्पलाईन क्रमांक टाकावा, महिन्याच्या कोणत्याही दिवशी महिन्याच्या अखेरच्या दिवसापर्यंत लाभधारक रेशन दुकानामध्ये रेशन घेण्यास आल्यास त्याला दुकानदाराने धान्य उपलब्ध करुन देणे बंधनकारक आहे, 


असे न केल्यास त्या दुकानदारावर नियमानुसार कारवाई करण्याच्या सूचना संबंधितांना दिल्या आहेत. वरील सूचना फलक सर्व रास्तभाव दुकानदारांनी लावले आहेत किंवा नाही' याबाबत जिल्हापुरवठा अधिकारी व नियंत्रक, शिधावाटप यांनी खात्री करुन अहवाल एक महिन्याच्या आत शासनास सादर करणे बंधनकारक आहे, उस्मानाबाद जिल्ह्यासह परांडा तालुक्यात याची अंमलबजावणी होत नाही. म्हणुन तहसीलदार यांनी भरारी पथके तयार करुन दोषी आढळणाऱ्या दुकानदारांवर कारवाई करावी. रेशन दुकांदारांच्या सोबत वरील शासन निर्णयांची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी गावकामगार तथा सदर समितीचे सदस्य , सचिव , तलाठीच आहेत. त्यामुळे गावचे तलाठी व रेशन दुकानदार मिळून गैरप्रकार  करीत  असल्याचे  सांगुन त्यांच्यावर  कारवाई करण्याची मागणी तहसिलदार परंडा यांचे मार्फत जिल्हाधिकारी उस्मानाबाद यांना निवेदन देऊन करण्यात आली आहे. या बाबींची पुर्तता न झाल्यास संघटनेच्या  वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर  आंदोलन करण्याचा इशाराही देण्यात आला आहे.

         
  निवेदनावर संघटनेचे  जिल्हाध्यक्ष अजिनाथ राऊत, जिल्हा उपाध्यक्ष कानिफनाथ सरपणे, जिल्हा सरचिटणीस नवनाथ कसबे, तालुकाध्यक्ष आकाश चव्हाण, फकीरा दलाचे गोवर्धन शिंदे, तुळजाराम कांबळे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

 
Top