तुळजापूर दि १९ डॉ. सतीश महामुनी
तीनशे पंचवीस कोटी रुपयाचा तुळजापूर तीर्थक्षेत्र विकास आराखडा राबविल्यानंतर देखील तुळजापूर येथील येणाऱ्या भाविक भक्तांना बसस्थानकामध्ये चिखलामध्ये पाय ठेवावा लागत आहे. मोठ्या प्रमाणावर दुर्लक्ष झाल्यामुळे तुळजापूर बसस्थानक पावसाच्या पाण्याने भरले आहे. मोठमोठ्या खड्ड्यांनी बसस्थानकामध्ये पाणी साचले आहे.
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ यांच्या देखरेखीखाली असणाऱ्या तुळजापूर बसस्थानकामध्ये बाहेरगावाहून येणाऱ्या भाविकांची खूप मोठी संख्या आहे. येथील जुन्या बसस्थानक परिसरात खूप मोठ्या प्रमाणावर खड्डे पडले आहेत. मागील 20 वर्षांपासून या बसस्थानकाचे दुरुस्तीचे काम न केल्यामुळे तसेच विभागीय परिवहन अधिकारी यांच्या दुर्लक्षामुळे या बसस्थानकाची दुर्दशा झालेली आहे.
दररोज हजारो भाविकांची वर्दळ या बसस्थानकामध्ये आहे. सोलापूर औरंगाबाद पुणे या सारख्या शहरांना जाणाऱ्या दोनशे बस गाड्या येथून प्रवास करतात बसमध्ये चढण्यासाठी आणि उतरण्यासाठी नागरिकांना नाहकच त्रास सहन करावा लागत आहे. या बसस्थानकाला कोणी वाली आहे का ? असा प्रश्न प्रवाशातुन उपस्थित केला जात आहे. त्यामुळे तातडीने जुन्या बसस्थानक परिसराचे सिमेंटीकरण करुन बसस्थानक स्वच्छ करावे अशी प्रवाशांची मागणी आहे.
बस स्थानकासारख्या महत्त्वाच्या प्रश्नाला विकास आराखड्याने न्याय न दिल्यामुळे प्रवाशांमध्ये संतापाची भावना आहे. त्यामुळे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी प्रत्यक्ष पाहणी करून बसस्थानकाच्या सिमेंटीकरण करण्याच्या कामाला प्राधान्य देऊन काम पूर्ण करावे अशी मागणी होत आहे.