काटी , दि .२९

 तुळजापूर तालुक्यातील काटी ते जवळगाव या डांबरी रस्त्याची जवळपास २५ वर्षांच्या काळात एकदाही दुरुस्ती झाली नाही. या डांबरी रस्त्यावरील मोठमोठे खड्डे गेल्या अनेक दिवसांपासून परिसरातील नागरिकांसाठी डोकेदुखी ठरले आहे. आता मात्र या रस्त्याचे दुरुस्ती शक्य नाही, तर रस्ताच नव्याने तयार करावा लागणार आहे.  आता या रस्त्याची प्रचंड दुरवस्था झाल्याने रस्त्यावरून चालताना नागरिकांना मोठी कसरत करावी लागत आहे.


काटी येथील बऱ्याच शेतकऱ्यांची जवळगाव (ता.बार्शी)  शिवारात शेती असल्याने त्यांना दररोज या रस्त्यावरून ये-जा करावी लागते. उसाच्या हंगामात याच रस्त्यावरून उसाच्या गाड्या भरून जातात. तसेच काटी येथील नागरिकांसाठी दुसरा रस्ताच नसल्याने त्यांना याच रस्त्यावरून प्रवास करावा लागतो. माल वाहतूकही येथूनच होते. या सर्व कारणांमुळे आणि रस्त्यावरील रहदारीमुळे रस्ता सुस्थितीत असणे गरजेचे आहे. मात्र, या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडल्याने वाहनधारकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. 

परिसरातील नागरिकांनी रस्त्याच्या कामाबद्दल अनेकदा संबंधित विभागाला विनंती करूनही उपयोग झाला नाही. हा रस्ता अनेक ठिकाणी दुतर्फा बाजूने खचला असून, ठिकठिकाणी पडलेल्या खड्ड्यांमुळे वाहनधारकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. रस्त्याची खडी निघून गेली आहे. शेतीमालाची वाहतूक करण्यासाठी व ये-जा करण्यासाठी अनेक अडचणीचा सामना करावा लागत असून येथील धनाजी देशमुख व जुबेर बेग या शेतकऱ्यांना खड्ड्यांचा अंदाज न आल्याने मोटारसायकल वरून पडून पाय फॅक्चर झाले आहेत. संबंधित विभागाने याची दखल घेऊन रस्त्याची दुरुस्ती करावी अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.

त्रिगुणशिल साळुंके ,  शेतकरी, काटी              

आता पावसाळा सुरू झाला आहे. पाऊस पडला की खड्ड्यात पावसाचे पाणी साचून राहतो. रात्री - बेरात्री येथून प्रवास करणाऱ्या वाहनधारकांना खड्ड्यांचा अंदाज येत नाही. त्यामुळे अपघाताचा धोका वाढला आहे. या रस्त्याचा वापर करणारे काटी व जवळगाव, आंबेगाव  गावातील नागरिक आता सरकारी दिरंगाईला वैतागले आहेत. लवकरच रस्त्याचे काम हाती घेण्यात आले नाही तर आंदोलनाची तयारी नागरिकांनी दर्शवली आहे. 
             
 
Top