काटी , दि .१९

डोंगर-दऱ्यासह गड किल्ल्यावर भटकंती करत, खडतर वाटेवरून चालताना एकमेकांना हात देत, डोंगरदऱ्यातून चालण्याचे डोंगरावरून वाहणारे धबधबे, निसर्गाचे विलोभनीय सौंदर्य टिपत, धुक्यामध्ये हरवलेला निसर्ग न्याहाळत पिंपळा बुद्रुक ता. तुळजापूर येथील स्नेहबंध ट्रेकर्स ग्रुपने हरिश्चंद्रगड ट्रेक पूर्ण केला. 


अप्रतिम निसर्ग सौंदर्याने नटलेला हरिश्चंद्रगड हा ट्रेकर्सची पंढरी म्हणुन ओळखला जातो. इको फ्रेंडली ग्रुप सोलापुरच्या मार्गदर्शनाखाली ही सफर संपन्न झाली .निसर्गाचा मनमुराद आनंद देणारा परिसर हा प्रत्येकास आपल्या मोहात पाडतो. तेथील सर्व सौंदर्यस्थळे पाहताना " ये मौसम का जादू है मितवा याचीच अनुभूती येते ".


आज भौतिक सुखांच्या मागे धावताना मानवाचे निसर्गा कडे दुर्लक्ष होत आहे. निसर्ग आपणास विविध घटनांच्या माध्यमातून त्याच्या शक्तीची जाणीव ही करून देत असतो. गड किल्ल्यावरील भटकंती, ट्रेकिंग यातून मनुष्य निसर्गाच्या जवळ येतो . "निसर्ग माझा सोबती" याशी जोडला जातो. *निसर्ग संवर्धन चळवळीत सहभागी होऊ या* हा संदेश देत हा ट्रेक आयोजित केला गेला. निसर्गाशी जवळीक व निसर्ग जपण्याच्या कर्तव्याची जाणीव अशातून मिळते. शिवाय शारीरिक तंदुरुस्ती बद्दलची जागृकता ही वाढीस लागते.


ठाणे, पुणे आणि नगर जिल्ह्यांच्या सीमेवर समुद्रसपाटीपासून ४८५० फूट उंचीवर असणारा अजस्त्र पर्वत म्हणजे हरिश्चंद्रगड होय .गडाचा इतिहास कुतूहलजनक तर भूगोल हा विस्मयकारक आहे. सर्व किल्ल्यांना मोगल अथवा मराठे यांच्या इतिहासाची पार्श्वभूमी आहे .तर हरिश्चंद्रगडाला दोन चार हजार वर्षापूर्वीची पौराणिक पार्श्वभूमी आहे.


 वनस्पतींची विविधता या गडा एवढी इतरत्र कुठेही पाहायला मिळत नाही. श्रावण महिन्यात निसर्गाने मुक्त हस्ताने सौंदर्याची केलेली उधळण पाहून मन प्रफुल्लित होते .उसळ्या मारत निघालेली नदी, सुरात गाणारे पक्षी, पायातल्या पैंजणासारखा मंजुळ आवाज करत नितळ पाण्याचे वस्त्र लपेटून वाहणारे झरे पाहून प्रत्येक जणच आनंदित होतो .या मोहिमेत हरिश्चंद्रेश्वराचे मंदिर, मंगळ गंगा नदीचे उगमस्थान, केदारेश्वराची गुहा, तारामती शिखर , कोकणकडा, धबधबे, सतत धो कोसळणारा पाऊस, अनेक भू- स्वरूपे इत्यादी ऐतिहासिक व भौगोलिक ठिकाणे पाहण्यात आली.


 विठ्ठल नरवडे ,विनोद चुंगे, प्रा. डॉ. शिवाजी मस्के, ज्योतिबा जाधव ,प्रा. डॉ. दीपक नारायणकर ,प्रा.डॉ. अरविंद दळवी, परशुराम कोकणे यांनी इतर इकोफ्रेंडली सदस्या समवेत हा ट्रेक यशस्वी पूर्ण केला.
 
Top