आरंभ सामाजिक संस्थेचे सचिव श्रमिक पोतदार तसेच संस्थेचे सदस्य सागरसिंग हजारी, पत्रकार आयुब शेख व पप्पु पाटील यांनी आपला वाढदिवस पालावरील शाळेत साजरा करून शैक्षणिक साहित्यापासुन वंचित राहिलेल्या पालावरील शाळेतील विद्यार्थ्यांना संपुर्ण शैक्षणिक साहित्य भेट देण्याबरोबरच त्यांना खाऊही वाटप केला.
आरंभ सामाजिक संस्थेच्या पदाधिकाऱ्यांच्या या कार्याचे कौतुक होत आहे. सामाजिक कार्यकर्ते उमाकांत मिटकर यांच्या संकल्पनेतुन सुरू करण्यात आलेल्या पालावरील शाळेपैकी एक शाळा नळदुर्ग येथील मरगम्मा वस्तीवर आहे. या शाळेत जवळपास ५० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. मात्र गेल्या दोन वर्षांपासुन शाळा बंद असल्याने या पालावरील शाळेतील विद्यार्थी शैक्षणिक साहित्यापासुन वंचीत राहिले आहेत. शिक्षणाची आवड असुनही केवळ शैक्षणिक साहित्य उपलब्ध न झाल्याने शिक्षणाच्या प्रवाहात आलेले हे मरगम्मा समाजातील विद्यार्थी पुन्हा शिक्षणापासुन दूर जाण्याची भीती होती. त्यामुळे पालावरील शाळेतील शिक्षिका मीरा मोटे यांनी शहरातील कांही सामाजिक कार्यकर्त्यांना याबाबतची माहिती दिली. यानंतर पुन्हा एकदा या सामाजिक कार्यात आरंभ सामाजिक संस्था धाऊन आली. संस्थेचे सचिव श्रमिक पोतदार, संस्थेचे सागरसिंग हजारी, पत्रकार आयुब शेख, व पप्पु पाटील या चौघांचा वाढदिवस दि.१ व २ ऑगस्ट रोजी होता. त्यांनी वाढदिवसावर होणारा खर्च टाळुन त्याच पैशांतुन त्यांनी पालावरील शाळेतील सर्व ५० विद्यार्थ्यांना संपुर्ण शैक्षणिक साहित्य भेट दिले. यामध्ये पाटी, पुस्तके, पेन्सिल, पेन, वह्या, खेळाचे साहित्य असे एकुण २५ प्रकारच्या वस्तु भेट दिल्या आहेत. एवढ्यावरच हे थांबले नाहीत तर या चौघांनी पालावरील शाळेत जाऊन तेथील विद्यार्थ्यांसोबत आपला वाढदिवस साजरा केला.
यावेळी झालेल्या कार्यक्रमास नगरसेवक बसवराज धरणे, सामाजिक कार्यकर्ते डॉ. जितेंद्र पाटील, पत्रकार विलास येडगे, सामाजिक कार्यकर्ते संजय विठ्ठल जाधव, अमर भाळे, माजी नगरसेवक सुधीरसिंग हजारी, आरंभ सामाजिक संस्थेचे अध्यक्ष राहुल हजारी, राजपुत समाजाच्या युवा संघटनेचे अध्यक्ष मनिशसिंग हजारी, भोई समाजाचे अध्यक्ष सुनिल उकंडे, भाजपाचे धीमाजी घुगे,विशाल डुकरे,आदर्श शिक्षक जितेंद्र मोरखंडीकर, पालावरील शाळेतील शिक्षिका सौ. मीरा मोटे व सौ. सोमवंशी हे उपस्थित होते. प्रारंभी सरस्वती पुजन करण्यात आले. यानंतर मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व खाऊचे वाटप करण्यात आले. आरंभ सामाजिक संस्थेचे सचिव श्रमिक पोतदार तसेच सागरसिंग हजारी आयुब शेख व पप्पु पाटील यांनी केलेल्या या कार्याचे सर्व स्तरांतुन कौतुक होत आहे. कारण यांच्या या कार्यामुळे शिक्षणाच्या प्रवाहातुन दुर जाणारे विद्यार्थी पुन्हा शिक्षणाच्या प्रवाहात राहुन शिक्षणाचे धडे गिरवु शकणार आहेत त्यामुळे हे काम फार मोठे आहे.