जळकोट,दि.३० : मेघराज किलजे 

तुळजापूर तालुक्यातील कर्नाटक व सोलापूर जिल्ह्याला जोडणारा जळकोट ते अचलेर या रस्त्याची अक्षरशः चाळण झाली असून , झोपेत असलेल्या प्रशासनाला जागे करण्यासाठी जळकोट येथील लोकसेवा टमटम चालक-मालक संघटनेतर्फे या रस्त्याची बेशरमने पूजन करून अनोखे आंदोलन करून त्वरित रस्ता दुरुस्तीची मागणी  केली आहे.



जळकोट ते  अचलेर हा २० किमी अंतराचा रस्ता अत्यंत दयनीय अवस्थेत असून रस्ता आहे की ? खड्ड्यात रस्ता हेच समजत नाही. गेल्या अनेक वर्षापासून हा रस्ता अत्यंत खराब झाला असून डांबरीकरण पूर्णपणे उखडले गेले आहे. त्यामुळे वाहनधारकांना एक खड्डा चुकल्यानंतर दुसरा खड्डा चुकवण्यासाठी संतुलन राखावे लागत आहे. या रस्त्यावरून सतत वर्दळ असते. या रस्त्यावर दुचाकी व हातावर पोट असलेल्या टमटम चालकांची याच रस्त्यावर जास्त वर्दळ आहे. 


टमटम चालक वैतागून गेले आहेत. कर्नाटक व सोलापूर जिल्ह्याला तसेच अक्कलकोट तीर्थक्षेत्रला हा रस्ता जोडला गेला आहे. त्यामुळे वेळोवेळी मागणी करूनही प्रशासन सुस्त आहे. खराब रस्त्यामुळे अनेकांचे मणक्यांचे आजार वाढले आहेत.
या रस्त्याच्या डांबरीकरणासाठी अनेक वेळा आंदोलने करण्यात आली आहेत. लोकप्रतिनिधी व प्रशासनाकडे वारंवार पाठपुरावा करूनही रस्ता दुरुस्त करण्यासाठी डोळेझाक करण्यात येत आहे. झोपलेल्या प्रशासनाला जागे करण्यासाठी जळकोट येथील लोकसेवा टमटम चालक-मालक संघटनेच्यावतीने या रस्त्याचे बेशरमने पूजन करून प्रशासनाचे लक्ष वेधण्यात आले आहे. 


लोकसेवा टमटम चालक-मालक संघटनेने रस्त्याचे बेशरमने पूजन करून आगामी काळात हा रस्ता दुरुस्त नाही झाला तर आम्ही तीव्र आंदोलन करू. असा इशारा दिला आहे. 


या आंदोलनात शिवसेनेचे तालुका उपप्रमुख कृष्णात मोरे, लोकसेवा चालक-मालक संघटनेचे बाळासाहेब कदम, व्यंकट कदम, नागनाथ कदम, तानाजी कदम, मुस्तफा जमादार, मुर्तू जमादार, गणेश सावंत, तानाजी कानडे, मुकेश कदम, मुरहारी, ज्ञानेश्वर सुरवसे, संदीप पांचाळ, बालाजी लोखंडे, नागेश भांगे, गणेश माने, बालाजी सावंत, सतिश गायकवाड, भाऊसाहेब कदम, चांद जमादार, श्रीधर लोखंडे, सतीश कदम आदि संघटनेचे चालक-मालक, गावातील युवक यांनी सहभाग नोंदवला.
 
Top