जळकोट, दि.१९ : मेघराज किलजे
बारामती येथील डॉ. आप्पासाहेब पवार कृषी महाविद्यालयाचा विद्यार्थी व जळकोटचे सुपुत्र, कृषिदूत ओमप्रकाश पटणे या विद्यार्थ्याने ग्रामीण जागृकता कार्यानुभव अंतर्गत जळकोट (ता. तुळजापूर) येथील युवा शेतकरी नमो कुंभार यांच्या मशरूम शेतीला भेट देऊन माहिती घेतली व शेतकऱ्यांशी संवाद साधला.
जळकोट येथील युवा शेतकरी नमो कुंभार यांनी दुष्काळावर मात करून व वाढत्या मजूर टंचाईला तोंड देण्यासाठी मशरूम शेती करण्याचा निश्चय केला.२०२० साला पासून ते मशरूम शेती करतात.१५ बाय२० च्या शेडमध्ये सुरुवातीला प्रयोग केला. सुरुवातीला त्यांना मशरूमचे खाद्य, सोयाबीनचा भुसा, चूना, मीठ, फॅमिलीन बाविस्तीन, प्लास्टिकची पिशवी या सर्व साहित्यासाठी एका प्लॉटसाठी तीन हजार रुपये खर्च आला. सुरुवातीला एका प्लॉटमध्ये २५ किलो मशरूमचे उत्पादन आले.
पण लॉकडाऊनमध्येही मशरूमला मागणी असल्यामुळे त्यांना दोन महिन्यांमध्ये बारा हजार रुपये नफा झाला. प्रियंका फूड्स हि कंपनीने विकत घेतली.
नमो कुंभार यांची यशोगाथा प्रत्यक्ष पाहण्यासाठी ओम प्रकाश पटणे या विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष भेट देऊन माहिती घेतली. यावेळी नमो कुंभार यांनी सांगितले की, मशरूम शेती ला बंदिस्त स्वरूपाची जागा लागते. मशरूम शेती करीता कच्चामाल म्हणजे शेतीमधील टाकाऊ घटक जसे गव्हाचा भुसा, सोयाबीनचा भुसा व कपाशीच्या काड्या हे टाकाऊ पदार्थ मशरूम शेती करण्यासाठी चालते. त्याचे निर्जंतुकीकरण करणे आवश्यक आहे. मशरूम शेतीला ७०ते ८० टक्के वातावरणातील आद्र्रता तर १८ते२८ अंश सेल्सिअस तापमान लागते. हवा खेळती असणे आवश्यक आहे. कष्ट व जिद्दीच्या जोरावर कमी खर्चात व कमी वेळेत शेतकरी मशरूम शेती मध्ये यशस्वी होऊ शकतात. अशोक कुंभार यांनी यावेळी सांगितले.
यासाठी ओमप्रकाश पटणे यांना डॉ. आप्पासाहेब पवार कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य गायकवाड व प्रा. सी.व्ही. शेंडे यांचे मार्गदर्शन लाभले. यावेळी ग्रामपंचायत सदस्य जीवन कुंभार, नागनाथ स्वामी व बसवराज स्वने आदिजण उपस्थित होते.