लोहारा , दि . ७ : 

     
लोहारा शहरासह तालुक्यातील भूकंपग्रस्त भागातील सुशिक्षित बेरोजगार युवक, युवतींना मुद्रांक शुल्क विक्रीचे परवाने देण्यात यावेत अशी मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे लोहारा तालुकाध्यक्ष माधव उर्फ नाना पाटील यांनी राज्याचे महसूल मंत्री ना. बाळासाहेब थोरात यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.


     
 महसूलमंत्री ना.  थोरात यांना दिलेल्या निवेदनात म्हटले की, लोहारा तालुका हा भुकंपग्रस्त व विकासापासून वंचित असलेला तालुका आहे. या तालुक्यात दळण वळणाच्या सोई सुविधांसह एम. आय. डी. सी व इतर मोठे उद्योग धंदे नसल्याने हजारो सुशिक्षित बेरोजगार युवकांवर उपासमारीची वेळ येत आहे.  सन १९९९ साली लोहारा तालुक्याची निर्मिती झाल्यानंतर कांही मोजक्याच लोकांना शासनाकडून मुद्रांक शुल्क विक्रीचे परवाने देण्यात आले होते. या नंतर शासनाने आजतागायत मुद्रांक शुल्क विक्रीचे परवाने देण्यास स्थगिती दिलेली आहे.
        

 त्यामुळे मुद्रांक विक्रीचे परवाने देण्यासाठी यावरील स्थगिती उठवून नवीन परवाने दिल्यास या भागातील सुशिक्षित युवकांच्या हाताला काम मिळेल व जनतेची होणारी गैरसोय दुर होईल याबाबत आपल्या स्तरावरून धोरणात्मक निर्णय घेऊन गरजूंना मुद्रांक शुल्क परवाने देण्यात असे निवेदनात म्हंटले आहे.
         
 या निवेदनावर राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे लोहारा तालुकाध्यक्ष माधव उर्फ नाना पाटील यांची स्वाक्षरी आहे. यावेळी माजी नगरसेवक गगन माळवदकर, पांडुरंग पाटील, यांच्यासह आदी उपस्थित होते.
 
Top