नळदुर्ग, दि. 20 :
तुळजापूर तालुक्यातील येडोळा, नंदगाव ग्रामपंचायतीस जिल्हास्तरीय "महाआवास अभियान विशेष पुरस्कार" जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा उस्मानाबाद यांच्यावतीने जाहीर करण्यात आले आहे. जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक यांनी पत्राद्वारे तुळजापूर पंचायत समितीच्या गटविकास अधिका-यास पुरस्कार जाहीर झाल्याचे कळविले आहे.
राज्यातील सर्व ग्रामीण गृहनिर्माण योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी व त्यामध्ये गुणवत्ता आणण्यासाठी दि. 20 नोव्हेंबर 2020 रोजीपासून राज्यात महा आवास अभियान - ग्रामीण राबविण्यात आले आहे. राज्यात दि. 20 नोव्हेंबर 2020 ते दि. 5 जून 2021 या कालावधीत महा आवास अभियान ग्रामीण मध्ये राबविण्यात आलेल्या उपक्रमांचे मूल्यमान करुन उत्कृष्ट काम करणा-या संस्था व व्यक्तींना महा आवास अभियान पुरस्कार व महाआवास अभियान पुरस्कार देवून गौरविण्यात यावे, असे कळविण्यात आले आहे.
तुळजापूर तालुक्यातील येडोळा सर्वोत्कृष्ट ग्रामपंचायत पुरस्कार व नंदगाव ग्रामपंचायतीस सर्वोत्कृष्ट क्लस्टर द्वितीय पुरस्कार जाहीर झाले आहे. हा पुरस्कार 15 ऑगस्ट रोजी पालकमंत्र्याच्या हस्ते प्रदान करण्यात येणार होता. मात्र हा कार्यक्रम तांत्रिक अडचणीमुळे पुढे ढकलण्यात आल्याचे समजते.