जळकोट,दि.२० मेघराज किलजे :
ज्ञान प्रबोधिनीचे संस्थापक कै. वि.वि. तथा आप्पा पेंडसे यांच्या स्मृतीदिनानिमित्त लोकसहभाग ( ग्रामपंचायत व जलदुत) व ज्ञान प्रबोधिनी हराळी, ता.लोहारा यांच्या माध्यमातून उस्मानाबाद जिल्ह्यातील १६ गावांमध्ये पर्जन्यमापक देण्यात आल्याची माहिती ज्ञानप्रबोधिनीचे प्रकल्प समन्वयक सचिन सूर्यवंशी यांनी दिली.
यामध्ये उमरगा तालुक्यातील ३, कळंब तालुक्यातील २ व उस्मानाबाद तालुक्यातील ११ गावांचा समावेश आहे. नियमित पर्जन्यमानाच्या नोंदी घेण्याची जबाबदारी त्या- त्या गावातील ज्ञान प्रबोधिनीच्या जलदुत यांनी घेतली आहे. पर्जन्यमापक बसविताना घ्यायची काळजी, नोंदी कशा पद्धतीने घ्यायच्या, घेतलेल्या नोंदीचा उपयोग कशा पद्धतीने करायचे इ. विषयी माहिती देण्यात आली. यावेळी ज्ञान प्रबोधिनी, हराळी केंद्राचे व्यवस्थापक सुहास पाठक, उस्मानाबाद जिल्ह्यातील २५ गावातील जलदुत व प्रबोधिनीचे कार्यकर्ते उपस्थित होते.