स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे रस्त्यावर भाजीपाला फेकून आंदोलन
भाजीपाल्याचे दर गडगडले; शेतकर्यांना प्रतिक्विंटल हजार रूपये अनुदान द्या
उस्मानाबाद ,दि .२७ :
भाजीपाल्याबरोबर दुधाचे भाव प्रचंड प्रमाणात घसरले आहेत. बी-बियाणे, खते, औषधे व मजुरीचा खर्चही निघत नसल्यामुळे शेतकर्यांनी जगायचे कसे? असा सवाल करत स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भाजीपाला फेकून आंदोलन केले.
केंद्र सरकार आणि राज्य सरकार हे जनसामान्यांच्या हिताचे कुठलेही निर्णय घेत नाहीत. अत्यंत वाईट अवस्थेत शेतकर्यांची स्थिती आहे. कुठलेही उत्पन्न घ्यायचे असेल तर त्याचा खर्च सुद्धा निघत नाही. दोन्हीही सरकारे शेतकर्यांच्या हितासाठी निर्णय घेताना दिसत नाहीत. त्यामुळे सर्व भाजीपाला पिकांना प्रतिक्विंटल एक हजार रूपये अनुदान व हेक्टरी एक लाख रूपये नुकसान भरपाई द्यावी, दुधाला योग्य दर मिळावा या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने जिल्हाध्यक्ष रवींद्र इंगळे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करून मागण्याचे निवेदन देण्यात आले.
निवेदनावर संघटनेचे जिल्हाध्यक्ष रवींद्र इंगळे, तानाजी पाटील, राजेंद्र हाके, महादेव मुंडे, उद्धव भोजने, नोताजी जमदाडे, प्रदीप जमदाडे, ज्ञानेश्वर जमदाडे पांडुरंग काकडे, नवनाथ शिंदे, भैय्या भोरे, संतोष कानडे, जयदीप बोदले, शशि चव्हाण, दत्तात्रय खैरे, सूर्यकांत खैरे आदी पदाधिकार्यांच्या स्वाक्षरी आहेत.