महाराष्ट्राच्या प्रदेशाध्यक्षपदी राजाभाऊ गायकवाड ( गोंधळी ) यांची निवड

तुळजापूर दि ९ : 

अखिल भारतीय  गोंधळी  संघटनेच्या नवनिर्वाचित प्रदेश अध्यक्षपदी राजेंद्र गायकवाड ( गोंधळी  ) यांची तर मुंबई प्रदेशाध्यक्षपदी दिलीप शिंदे यांची एक मताने निवड करण्यात आली. 

निवडीनंतर राष्ट्रीय अध्यक्ष राजेंद्र वनारसे, तुळजापूरचे नगराध्यक्ष सचिन रोचकरी, तहसीलदार सौदागर तांदळे या मान्यवरांच्या उपस्थितीत नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा सत्कार  केला.  अध्यक्षपद तुळजापूर येथील लोककलावंतांना मिळाल्यामुळे  तुळजापुरात जोरदार स्वागत करण्यात आले.

अखिल भारतीय गोंधळी समाज संघटनेची वार्षिक सर्वसाधारण सभा तुळजापूर येथील नगर परिषदेच्या सराया धर्मशाळेत ९ ऑगस्ट क्रांती दिनाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आली होती. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रीय अध्यक्ष राजेंद्र वनारसे होते. सभेच्या उद्घाटन प्रसंगी नगराध्यक्ष सचिन रोचकरी, तहसीलदार सौदागर तांदळे, कर्नाटकचे प्रदेशाध्यक्ष सिद्राम वाघमारे, सुरेश ढवळे, बाबासाहेब कदम, विजय वाघमारे, सुरेश संग्राम काळे यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते. 

उद्घाटन समारंभानंतर वार्षिक सर्वसाधारण सभेची कार्यवाही पूर्ण करण्यात आली.   राजेंद्र वनारसे यांनी यानिमित्ताने संघटनेच्या विविध पदाधिकाऱ्यांची निवड करून त्यांना नियुक्ती पञ दिले. पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. तुळजापूरचे कलावंत रवी रेणके यांच्या समूहाच्या वतीने या कार्यक्रमात उत्तम गोंधळी गीत सादर करण्यात आले.

याप्रसंगी मार्गदर्शन पर बोलताना  राजेंद्र वनारसे यांनी पारंपारिक लोककला नवीन पिढीला सांगण्यासाठी संघटनेला खूप मोठे कष्ट घ्यावे लागणार आहेत , अनेक वर्षापासून संघटना कलेची जोपासना करण्यासाठी काम करत असताना कलाकारांची प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करीत आहेत . अनेक प्रश्नांमध्ये यश मिळाले असले तरी काही प्रश्न अद्याप सोडले गेले नाहीत. त्यामुळे या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी सर्व कलावंतांनी संघटनेला प्राधान्य देत सक्रिय राहावे असे आवाहन केले.

अखिल भारतीय स्तरावर कार्य करणाऱ्या संघटनेच्या महाराष्ट्र प्रदेशाची वार्षिक सर्वसाधारण सभा तीर्थक्षेत्र तुळजापूर येथे घेण्यात आली तुळजापूर येथील ज्येष्ठ लोककलावंत राजा भाऊ गायकवाड गोंधळी हे अनेक वर्षे या संघटनेत सक्रिय असून राष्ट्रीय अध्यक्ष यांच्या उपस्थितीत राजा भाऊ गायकवाड गोंधळी यांच्याकडे महाराष्ट्र प्रदेशाची अध्यक्षपद आजच्या या सभेत देण्यात आले. त्यांच्या निवडीनंतर सत्कार प्रसंगी उपस्थित कलावंतांनी टाळ्यांच्या गजरात त्यांचे अभिनंदन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन लातूर जिल्हा कार्याध्यक्ष दत्तात्रय  घोगरे यांनी केले.
 
Top