लोहारा , दि .२०
तालुक्यातील स्पर्श ग्रामीण रुग्णालय सास्तुर अंतर्गत प्राईड इंडिया संचालित फिरते वैद्यकीय पथकाच्या माध्यमातून खेड (ता.लोहारा) येथे रक्तदाब-मधुमेह आणि डोळे तपासणी शिबीर संपन्न झाले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खेड ग्रामपंचायतचे प्रशासक एस.जी. पाटील हे तर प्रमुख पाहुणे म्हणून ग्रामविकास अधिकारी नेताजी दबडे हे होते. प्रास्तविकात अच्युत आदटराव म्हणाले कि, प्रकल्प व्यवस्थापक स्पर्श ग्रा.रु.सास्तूरचे रमाकांत जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली उस्मानाबाद- लातूर जिल्ह्यातील १२६ गावामध्ये प्राईड इंडिया स्पर्शच्या चार अद्यावत मोबाईल मेडिकल युनिटच्या माध्यमातून आरोग्य सेवा देण्याचे व्रत सातत्याने सुरु आहे. गावातील ३० पेक्षा अधिक वयोगटातील प्रत्येक नागरिकांना आपल्या शरीरातील मधुमेह आणि रक्तदाबाची स्तिथी माहिती असणे आवश्यक आहे. आपल्याला आजार आहे हेच माहित नसणाऱ्या लोकांची संख्या जास्त असल्याने भविष्यात अनेक आरोग्य समस्यांचा सामना करावा लागू शकतो. यामुळे गावातील प्रत्येक व्यक्तीची मधुमेह आणि रक्तदाबाची तपासणी करून आजाराचे निदान होणाऱ्या लोकांना समुपदेशन, उपचारासंबंधी मदत करण्यात येणार आहे.
तसेच गावातील जेष्ठ नागरिकांना डोळ्याच्या समस्याचा सामना करावा लागत असल्याने डोळ्याची मोफत तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले आहे. या शिबिराच्या माध्यामतून गरजू लोकांना मोफत चष्म्याचे वाटप स्पर्श च्या वतीने करण्यात येणार आहे.
ग्रामविकास अधिकारी नेताजी दबडे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले कि, कोव्हीड-१९ अजून आपल्यातून गेलेला नाही. आपले गाव १०० % कोव्हीडमुक्त करण्यासाठी गावाचे १०० % लसीकरण करणे गरजेचे आहे. भारतात बनलेली लस सुरक्षित व प्रभावी असून आपल्या जवळच्या आरोग्य केंद्रामध्ये कोव्हीड-१९ ची लस मोफत उपलब्ध आहे. तरी सर्व गरोदर माता, १८ पेक्षा जास्त वयोगटातील तरुण/तरुणी व जेष्ठ नागरिकांनी लसीचे दोन्ही डोस घेऊन कोव्हीड-१९ च्या तिसऱ्या लाटेपासून संरक्षण करावे. लस टोचल्यावरही मास्कचा नियमित वापर, इतरापासून दोन मिटरचे अंतर व आपले हात साबणाने वांरवार स्वच्छ धुवा व आफवावर विश्वास ठेवू नका. अधिक माहितीसाठी जवळच्या आरोग्य केंद्राशी संपर्क साधा.
सदर शिबिरामध्ये एकूण ३५० लोकांची रक्तदाब/मधुमेह तपासणी करण्यात आली तर दस्तगीर मुजावर (नेत्रचिकित्सा अधिकारी) यांनी २४४ लोकांची डोळ्याची तपासणी केली. सूत्रसंचालन किरण कदम यांनी केले तर आभार डॉ. प्रशांत जाधव यांनी केले.
यावेळी कार्यक्रम अधिकारी अच्युत आदटराव, डॉ. प्रशांत जाधव, डॉ. दस्तगीर मुजावर, पुनम राजपूत, छबू माने, पवन राठोड, सविता लंगोटे, किरण कदम, सुरज चव्हाण, प्रवीण कांबळे, गणेश नेवरे, बालाजी क्षिरसागर, ए.बी. गव्हाळे, पी.एस. गव्हाळे, महादेव गव्हाळे, सुकूमार दगडू सुरवसे, नसिफा अयुब मुल्ला, इत्यादी उपस्थित होते. आरोग्य शिबीर यशस्वी करण्यासाठी मोबाईल मेडिकल युनिटच्या सर्व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.