ग्रंथालयातील अमूल्य साहित्याची दुर्दशा आणि उपेक्षा
(राष्ट्रीय ग्रंथपाल दिन विशेष - 12 ऑगस्ट 2021)
समाजात बौद्धिक, शैक्षणिक आणि मानवी सर्वांगीण विकासासाठी ग्रंथालये महत्वाची भूमिका बजावतात. त्यांचे महत्व कधीही कमी लेखले जाऊ शकत नाही, काळानुसार ग्रंथालयांचे महत्व अफाट वाढत आहे, तसेच या क्षेत्रात लक्षणीय प्रगती देखील झाली आहे, पण जेव्हा आपण आपल्या समाजातील आजूबाजूच्या ग्रंथालयांकडे बघतो तर असे दिसून येते की ग्रंथालय विकासाकडे नाही तर नष्ट होण्याचा मार्गावर जात आहे. ग्रंथालयांमध्ये उपलब्ध असलेला अमूल्य साहित्य वारसा जीर्ण अवस्थेत दिसतो. ग्रंथालयांमध्ये सुविधांचा अभाव आणि समस्यांचे डोंगर उभे आहेत, परंतु समस्या सोडवणारे संबंधित व्यक्ती किंवा विभागाकडून निश्चितच सकारात्मक आश्वासन असते की समस्या लवकरच सोडवल्या जातील. दिवस, महिने, वर्षे, दशके गेली पण समस्या थांबायचे नाव घेत नाही.
देशात झपाट्याने वाढणाऱ्या लोकसंख्येच्या सुविधांसाठी नवीन वसाहती, जिम, स्पा, जलतरण, गेम झोन, गार्डन्स, सामाजिक आणि धार्मिक संस्था, बाजारपेठा, मॉल्स, रुग्णालये सर्व तयार केली जातात. पण या विकसित सोसायट्यांमध्ये ग्रंथालयाला कोणतेही महत्वाचे स्थान आहे असे वाटत नाही. शहरीकरण ज्या वेगाने वाढत आहे त्या तुलनेत ग्रंथालये सतत कमी होत आहेत. स्वातंत्र्यापूर्वी आणि नंतर देशभरात मोठ्या प्रमाणात ग्रंथालयांचा विस्तार झाला. अनेक ग्रंथालये शंभर वर्षांपेक्षाही जुनी आहेत, येथील साहित्य संग्रह देखील तेवढेच जुने आहे, म्हणजे हे अतिशय मोल्यवान साठा आहे. येथे एकेकाळी 15-20 कर्मचारी ग्रंथालयांमध्ये सेवा देण्यासाठी काम करायचे, आज तिथे केवळ 1-2 कर्मचारी दिसून येतात. या ग्रंथालयांमध्ये दुर्मिळ मौल्यवान खजिन्याच्या स्वरूपात साहित्य संग्रह आहेत जे तुम्ही कुठेही शोधले तरी सापडणार नाही. या अमूल्य साहित्याचे संरक्षण दागिन्यांसारखे व्हायला पाहिजे, परंतु याउलट हे साहित्य नष्ट होण्याची स्थिती सांगत आहे. अशा अनेक जुन्या ग्रंथालयांची दुर्दशा देशातील प्रत्येक जिल्ह्यात आणि शहरात दिसून येते.
केवळ ग्रंथालय माहिती शास्त्र क्षेत्रातील तज्ञच ग्रंथालयाचे योग्य व्यवस्थापन करू शकतात आणि वाचकांना उत्तम सेवा पुरवू शकतात, पण देशातील अनेक राज्यातील शाळा, सार्वजनिक ग्रंथालये आणि इतर विभागातील ग्रंथालयात खुप वर्षांपासून कर्मचाऱ्यांची भरतीच केलेली नाही आहे. कर्मचारी निवृत्त होत राहतात पण नवीन कर्मचारी रूजू होत नाहीत, अनेक ठिकाणीतर हे ग्रंथालय चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांच्या भरोस्यावर चालू आहेत, अनेक ग्रंथालयात काम करणारे कर्मचारी अत्यंत कमी पगारावर आहेत आणि त्यांना अनेक महिने वेळेवर पगारही मिळत नाही. एकीकडे आपण दर्जेदार शिक्षणाचा प्रचार-प्रसार करतोय आणि दुसरीकडे समाजातील या महत्वपूर्ण ग्रंथालयांच्या विकासाकडे दुर्लक्ष करत आहोत. या ग्रंथालयांमध्ये वाचकांसाठी अत्याधुनिक संसाधने मिळणे तर दूर, मूलभूत ग्रंथालयीन सेवा देखील नाहीत. अनेक ग्रंथालयांमध्ये साहित्याच्या नावावर फक्त काही वृत्तपत्रे येतात. ग्रंथालयात अभ्यास करण्यासाठी विद्यार्थी खुप दुर-दुरून येतात, शहरे आता महानगराचे रूप धारण करत असल्याने ग्रंथालयांची संख्या त्यानुसार वाढत नाही आहे. देशात ग्रंथालयांची फार कमतरता आहे.
देशभरातील हजारो ग्रंथालये त्यांच्या अस्तित्वाची शेवटची लढाई लढत आहेत म्हणजेच पुष्कळ ग्रंथालये पुरेसा निधी आणि उत्तम व्यवस्थापनाअभावी नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत, तेथील अमूल्य पुस्तके, हस्तलिखिते, मौल्यवान पाठ्यसामग्री खराब व गहाळ होत आहे, अनेक ग्रंथालयात वाचकांसाठी पुरेसे टेबल, खुर्च्या, पंखे, लाइट, पिण्याचे पाणी, स्वच्छतागृहे नाही, तर कुठे वीज देखील नाही आणि ग्रंथालय इमारतीच्या खिडक्या, दरवाजे, भिंती कमकुवत झाल्या आहेत. पावसात छतावरून पाणी टपकते. ग्रंथालयाची इमारत जीर्ण अवस्थेत आहेत, त्यामुळे कधीही मोठा अपघात होऊ शकतो. ही परिस्थिती लहान शहरांपासून मोठ्या महानगरापर्यंत सर्वत्र दिसून येते, तरी अशा परिस्थितीतही वाचक मोठ्या प्रमाणात ग्रंथालयांचा वापर करत आहेत. उज्ज्वल भविष्यासाठी उत्तम अभ्यास आणि स्पर्धा परीक्षांमुळे तरुणांचा ग्रंथालय / वाचनालयाकडे कल वाढला आहे. ग्रंथालये वाचकांना शाळेपासून आयुष्याच्या शेवट पर्यंत साथ देतात आणि आज अशी अनेक ग्रंथालय स्वताच्याच शेवटच्या दिवसांपर्यंत पोहोचली आहे, जेव्हाकि देशाच्या सामाजिक विकासात ग्रंथालयांचे अमूल्य योगदान असते.
कर्मचाऱ्यांची कमतरता आणि योग्य देखरेखीच्या अभावामुळे ग्रंथालयात पुस्तक चोरीच्या अनेक घटना घडतात, पुष्कळशा पुस्तकांची पानेही फाटलेली आढळतात, लोक पुस्तकांमधून त्यांच्या आवडीचे फोटो किंवा माहिती कापतात, यामुळे अनेक मौल्यवान पुस्तके नष्ट झाली आहेत. फाटलेली जुनी पुस्तके, नवीन पुस्तकांचा अभाव, मासिके व वर्तमानपत्रांचा अभाव, हे सर्व मिळून ग्रंथालयाची प्रतिष्ठा डागाळत आहेत. कित्येक ग्रंथालयात तुटलेल्या फर्निचर चा ढीग लागला आहे. ग्रंथालयातील पुस्तक रॅक दुरूस्त नाहीत, सगळे अस्त-व्यस्त असल्यामुळे ग्रंथालयात असलेल्या अमूल्य पुस्तकांमध्ये दीमक लागली आहे, तसेच मुंग्यांसह उंदीर देखिल साहित्य उद्ध्वस्त करत आहेत.
अनेकदा अशा समस्याग्रस्त ग्रंथालयांचा अमूल्य साहित्यवारसा जतन आणि सुधारण्यासाठी संबंधित अधिकारी किंवा समितीला निवेदन देऊन कळवले जाते, त्यांचे वारंवार लक्ष वेधले जाते आणि ते सुद्धा उत्तराचा स्वरूपात म्हणतात की लवकरच समस्या सुटेल पण वेळ निघत जातो आणि वेळेनुसार समस्या देखिल वाढत जातात. पण, ग्रंथालयातील अमूल्य साहित्य संग्रहाची दुर्दशा, अपव्यय आणि दुर्लक्ष का होत आहे? बऱ्याचदा बातमी ऐकायला मिळते की अनेक जुन्या ग्रंथालयांवर बेकायदेशीरपणे अतिक्रमण करण्याचा प्रयत्न केला जातो, तर कुठे अनेक ग्रंथालयांचा बाजूलाच केरकचरा टाकण्यात येतो, ज्यामुळे ग्रंथालयांमध्ये दुर्गंधी आणि डासांचा प्रादुर्भाव असतो. ग्रंथालयाचा आवारात पावसात चिखल जमा होतो, त्यामुळे बरेच गवत वाढत असते. अशा परिस्थितीत वाचक स्वतःला असुरक्षित समझतात.
या अशा समस्यांमुळे वाचकांपर्यंत योग्य साहित्य पोहोचत नाही, मग ग्रंथालय माहिती विज्ञानाचे जनक पद्मश्री डॉ. एस. आर. रंगनाथन यांनी दर्शविलेल्या फाइव लॉ चे पालन करणे तर खूप दूर आहे. देशभरात डॉ. एस. आर. रंगनाथन यांचा वाढदिवस 12 ऑगस्ट रोजी “राष्ट्रीय ग्रंथपाल दिन” म्हणून साजरा केला जातो. त्यांनी ह्या क्षेत्रात अनेक महत्त्वाच्या पदांवर काम केले आहे, त्यांना जागतिक स्तरावर ग्रंथालय माहिती विज्ञान क्षेत्रात अतुलनीय योगदानासाठी 1957 मध्ये भारत सरकारने पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केले. जर आज डॉ. रंगनाथनजी असते तर अशा समस्याग्रत ग्रंथालयांना पाहून त्यांना काय वाटले असते? परदेशात या अमूल्य दुर्मिळ साहित्याचे उत्कृष्ट व्यवस्थापन आणि उपयोगितांकडे विशेष लक्ष दिले जाते, त्याच्याशी संबंधित प्रत्येक पैलूचे महत्त्व समजले जाते आणि असेच असायला पण हवे कारण हे अनमोल अत्यंत दुर्मिळ साहित्य पुन्हा कधीच सापडणार नाही, परंतु आपण फक्त महत्त्व मानतो पण वास्तवात जाणत नाही.
डॉ. प्रितम भि. गेडाम