तुळजापूर , दि . ११
तुळजापूर शहरातील अतिष इन्स्टिटयूट ऑफ टेक्नॉलॉजी या संस्थेच्या वतीने दहावीच्या परीक्षेत उज्वल यश प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांचा व त्यांच्या पालकांचा 'स्वप्नपंख' गुणगौरव सोहळा घेण्यात आला.
कार्यक्रमास तहसीलदार सौदागर तांदळे, नगराध्यक्ष सचिन रोचकरी, तु. भ. अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. एन. डी. पेरगाड, यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. अनिल शित्रे , प्रोफेशनल टीचर्स असोसिएशनचे राज्य कोअर सदस्य डॉ. आनंद मुळे व प्रा. प्रशांत भागवत उपस्थित होते.
तहसीलदार सौदागर तांदळे यांनी विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेत यशस्वी होण्यासाठी अत्याधुनिक साधन सुविधा आणि इंटरनेट यासह शिक्षकांनी दिलेला अभ्यास वेळेमध्ये पूर्ण झाला पाहिजे असे सांगितले.
नगराध्यक्ष सचिन रोचकरी यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करताना तुमचा निकाल हा तुळजापूर शहराच्या शैक्षणिक क्षेत्रासाठी अभिमानास्पद आहे, शहराचा शैक्षणिक दर्जा कायम ठेवण्यासाठी गुणवत्ता कायम राहिली पाहिजे असे गौरवोद्गार काढले. डॉ. आनंद मुळे यांनी महाविद्यालयीन शिक्षण घेताना विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास उंचाविण्यासाठी महत्वाच्या सूचना केल्या. महाविद्यालयीन शिक्षणात विद्यार्थ्यांनी विषयातील संकल्पना समजावून घेण्यावर जास्त भर द्यावा असे मार्गदर्शन डॉ. अनिल शित्रे यांनी केले. कार्यक्रमातील सर्वच मान्यवरांनी विद्यार्थ्यांनी कोरोनाच्या तणावपूर्ण परिस्थितीत मिळविलेल्या यशाचा समाजाच्या सर्वच स्तरातून सन्मान झाला पाहिजे व विद्यार्थ्यांचे कौतुक झाले पाहिजे असे मत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक ए.आय.टी. चे संचालक प्रा. अतिष घाटशिळे यांनी तर सूत्रसंचालन श्रीमती जयमाला वाटणे यांनी केले. स्वप्नपंख या कार्यक्रमात बोर्ड परीक्षेत उत्तीर्ण या विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी युथ फाउंडेशन च्या सदस्यांनी परिश्रम घेतले. गुणवंत विद्यार्थ्यांना भगव्या रंगाचे फेटे बांधून मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.