जळकोट, दि.१५
येथून जवळच असलेल्या जल्कोटवाडी (नळ) येथील शेतकऱ्यांनी शेतीसाठी शेतरस्ता अडवल्याने शेतीला जाण्या- येण्यासाठी नाहक त्रास सहन करावा लागत होता. तुळजापूरच्या तहसीलदारांनी तात्काळ दखल घेऊन, जळकोट मंडळाधिकारी यांनी प्रत्यक्ष येऊन हा शेतरस्ता तात्काळ खुला करून दिला आहे. यामुळे शेतकऱ्यांमधून समाधान व्यक्त केले जात आहे.
जळकोटवाडी (नळ) येथील शेत रस्ता महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेतून सर्व शेतकऱ्यांच्या संमतीनुसार करण्यात आला होता. परंतु कालांतराने काही शेतकऱ्यांनी रस्ता अडवला होता. सदर रस्त्यावर वहिवाट करता येत नव्हती. त्यामुळे महाग त्रास काही शेतकऱ्यांना सहन करावा लागत होता. त्यामुळे शेतकरी त्रंबक कदम, बंकट कदम, अंगद कदम, अंबाजी कदम, राम कदम, मधुकर कदम, शंकर कदम व बालाजी कदम या शेतकऱ्यांनी तहसीलदार सौदागर तांदळे यांना लेखी तक्रार दाखल केली होती. या तक्रारींची तहसीलदारानी तात्काळ दखल घेऊन जळकोट महसूल मंडळाधिकारी पी.एस.भोकरे यांना कार्यवाही करण्यासाठी आदेशित केले होते.
भोकरे व जळकोटचे तलाठी तात्यासाहेब रुपनवर यांनी परिस्थितीची शहानिशा करून शेतकऱ्यांसाठी रस्ता सुरळीत करून दिला. यामुळे शेतकऱ्यांमधून समाधान व्यक्त केले जात आहे.
यावेळी सरपंच शिवाजी कदम, पोलीस पाटील देविदास वागदरे, शिवाजी वागदरे, विष्णू वागदरे, सुरेश वागदरे, हरिदास वागदरे, शिवाजी वागदरे, गोरख वागदरे, अशोक दूधभाते आदी शेतकर्यासह ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ उपस्थित होते.