तुळजापूर , दि .१० राजगुरू साखरे :
तुळजापूर तालुक्यात मागील पंधरा ते वीस दिवसांपासून पावसाने उघडीप दिल्यामुळे बहरात आलेले खरिपाची पिके संकटात सापडले आहेत.
या भागातील शेतकऱ्यांनी खरीप हंगामातील प्रामुख्याने सोयाबीन, उडीद,मुग,मका,तुर आदी पिकांचा पेरा मोठ्या प्रमाणावर केला आहे. विशेषता अलीकडे या भागातील शेतकरी सोयाबीन पिकास नगदी पीक म्हणून पाहिले जाते, सध्या सोयाबीन पीक फुले व शेंगा भरण्याच्या अवस्थेत आहे त्यातच मागील पंधरा ते वीस दिवसांपासून पावसाने पूर्णपणे उघडीप दिल्याने दुपारच्या वेळेत पिके माना टाकू लागले आहेत. त्यामुळे मोठ्या आर्थिक संकटात पेरणी केलेल्या सोयाबीन पिकास शेतकरी तुषार सिंचनाद्वारे पाणी देऊन पीक जगण्यासाठी धडपड करत असल्याचे दिसून येत आहे.
एकंदरीत येत्या तीन ते चार दिवसात पाऊस नाही झाला तर उत्पादनामध्ये मोठी घट येण्याची शक्यता शेतकरी बांधवातुन वर्तवली जात आहे, त्यामुळे तालुक्यातील शेतकरी पुरता हवालदिल झाला आहे.