तुळजापूर , दि . १०
महसूल विभाग आणि पोलिसांनी हाॅटेल, धाब्यावर कारवाई करुन ७ लाख ७० हजार ४०० रुपयांचे ९ हजार ६३० लीटर बायोडिझेल सदृश ज्वलनशील पदार्थ जप्त केले. या प्रकरणी ५ जणा विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई गुरुवारी करण्यात आली असुन या कारवाईने सर्वञ खळबळ उडाली आहे.
उस्मानाबाद जिल्हाधिकारी डाॕ. कौस्तुभ दिवेगावकर यांच्या आदेशानंतर उपविभागीय अधिकारी योगेश खरमाटे, तुळजापूर तहसीलदार सौदागर तांदळे, नळदुर्ग पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक जगदीश राऊत यांच्यासह पथकाने महामार्गावरील जयशंकर ढाबा, मौजे आलियाबाद शिवारातील रामदेव हॉटेल, जळकोट शिवारातील गणेश ढाबा, हॉटेल गारवा, हॉटेल महाराजा आदी पाच ठिकाणी कारवाई करुन ९ हजार ६३० लिटर बायोडिझेल सदृश ज्वलनशील साठा केला आहे. याप्रकरणी पुरवठा अधिकारी संदीप जाधव यांनी दिलेल्या फिर्यादीवरून खासिम पप्पूमीया जमादार, शेषेराव शंकर काळे, सचिन दगडू हासूरे, दिनकर प्रभाकर सुरवसे, सत्यनारायण शिवाजी कदम (सर्व रा. जळकोट ता. तुळजापूर ) यांच्या विरुध्द मानवी जीवन धोक्यात येईल असे ज्वलनशील पदार्थ जाणीवपूर्वक हयगयीने विना परवाना विक्री करण्याचा उद्देशाने साठा केला म्हणून नळदुर्ग पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस करीत आहेत.