काटी , दि .११: उमाजी गायकवाड
कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव वाढत असल्याने शासनाने दिलेल्या नियम व अटीचे पालन करत व कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा संभाव्य धोका लक्षात घेत पोलिसांनी केलेल्या आवाहनाला गावातील सर्व पदाधिकारी व सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांतील सदस्यांनी प्रतिसाद देत " एक गाव एक गणपती " संकल्पना राबविण्याचा एकमताने निर्णय घेतला. त्यानुसार ग्रामपंचायत कार्यालयात एक गाव एक गणपतीची प्रतिष्ठापना करण्यात आली.
विघ्नहर्ता गणरायाच्या स्वागतासाठी गावातील सर्व प्रमुख मंडळाचे पदाधिकारी, सार्वजनिक गणेश मंडळांचे सदस्य एकत्रितपणे येऊन येथील ग्रामपंचायत कार्यालयात शुक्रवारी सायंकाळी सरपंच आदेश कोळी यांच्या हस्ते गणरायाची आरती व पुजन करुन गणपती बाप्पा मोरया.. मंगलमूर्ती मोरया..’ अशा जयघोषात अन् मंत्रोच्चारात लाडक्या गणरायाचे आगमन व प्रतिष्ठापना करण्यात आली.
यावेळी सरपंच आदेश कोळी, सोसायटीचे चेअरमन तथा भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष विक्रमसिंह देशमुख, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष अशोक जाधव, पत्रकार उमाजी गायकवाड, चंद्रकांत काटे, मकरंद देशमुख, बाळासाहेब भाले, माजी सैनिक श्रीकांत गाटे,संजय महापुरे, सुहास साळुंके,पोलीस पाटील जामुवंत म्हेत्रे, अविनाश वाडकर, पुजारी बाळासाहेब कुलकर्णी, प्रशांत सुरवसे, सुनिल गायकवाड आदीसह सर्व गणेशोत्सव मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते.