नळदुर्ग , दि .०६ : सुहास येडगे
नळदुर्ग येथील बोरी धरण हे सलग तिसऱ्या वर्षीही पूर्ण क्षमतेने भरले असल्याने सांडवा ओसंडून वाहत आहे, त्यामुळे या ओसंडणाऱ्या सांडव्याच्या पाण्याचे पूजन सोमवारी शहरातील सामाजिक कार्यकर्ते व पत्रकार यांच्या हस्ते करण्यात आले.
शनिवारी रात्री झालेल्या जोरदार पावसामुळे नळदुर्गचे बोरी धरण पूर्ण क्षमतेने भरले आसल्याने रविवारी सकाळी बोरी धरणाचा सांडवा ओसंडून वाहत आहे. दरम्यान तुळजापूर, नळदुर्ग शहरासह अणदुर आणि इतर ग्रामीण भागाचा सुमारे दोन वर्षाचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटला आहे. त्यामुळे बोरी धरणाच्या ओसंडून वाहणाऱ्या पाण्याचे पूजन शहरातील सामाजिक कार्यकर्ते संजय विठठल जाधव, जेष्ठ पत्रकार विलास येडगे, माजी नगरसेवक सुधीर हजारे, शहर पत्रकार संघाचे अध्यक्ष सुहास येडगे, पत्रकार शिवाजी नाईक, पत्रकार दादासाहेब बनसोडे, आणि सामाजिक कार्यकर्ते अमर भाळे यांनी केले. सांडव्याव्दारे पाण्याचा विसर्ग मोठया प्रमाणात होत आहे.
दरम्यान विसर्ग होणाऱ्या पाण्यामुळे बोरी नदीच्या पात्रात पाणी मोठया प्रमाणात वाढले आहे. हे पाणी किल्ल्यात जात आसल्याने एैतिहासीक किल्ल्यातील नर मादी धबधबे जोमाने वाहण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे कालपासूनच किल्ला पाहण्यासाठी पर्यटकांनी गर्दी केली आहे. नळदुर्ग शहरासह तुळजापूर आणि अणदुर त्याचबरोबर चिकुंद्रा, मानेवाडी, मुर्टा, हगलूर आदी गावांचा पिण्याचा पाण्याचा दोन वर्षापर्यंतचा प्रश्न मिटला आसल्याने तसेच शेतकऱ्यांच्या शेतीलाही हे पाणी मिळणार आसल्याने या पाण्यामुळे शेतकऱ्यांचे जमीन चांगल्या प्रकारे फुलणार आहे म्हणून या बोरी धरणाच्या पाण्याचे पूजन करण्यात आले आहे.