नळदुर्ग , दि. २२ विलास येडगे
टोलनाक्यापासुन १० कि.मी अंतरावरील गावांतील वाहनांकडुन टोलवसुली करू नये असा नियम असतांना फुलवाडी ता. तुळजापुर येथील एसटीपीएल या कंपनीने नियमबाह्यपणे टोल वसुल केला आहे. उस्मानाबाद जिल्हा प्रशासनाने तात्काळ याप्रकरणी या कंपनीवर कारवाई करून टोलनाक्यापासुन १० किमी अंतरावरील गावांतील वाहनांधारकाकडुन टोल वसुल करू नये असे आदेश द्यावेत अशी मागणी होत आहे.
सोलापूर हैद्राबाद महामार्गावरील फुलवाडी येथील टोलनाकाच मुळात सुरू करण्याची गरज नव्हती. कारण ज्या कामांसाठी हा टोलनाका उभारुन टोल वसुल केली जात आहे ते कामच अद्याप पुर्ण झालेले नाही. या टोलपासुन पुढे उमरगा पर्यंत रस्त्याचे, बायपास, उड्डाणपुल तसेच इतर बरीच कामे आजही अपुर्ण आहेत. असे असतांना कुणाला पोसण्यासाठी हा टोलनाका सुरू करण्यात आला आहे याची वरीष्ठ पातळीवरून चौकशी होणे गरजेचे आहे. त्याचबरोबर या टोलनाक्यावर नियमबाह्यपणे टोल वसुली केल्याचा प्रकारही समोर आला आहे. कारण सरकारी नियमानुसार टोलनाक्यापासुन १० किलोमीटर अंतरातील गावांतील वाहनांकडुन टोल वसुली करू नये असा नियम असतांना एसटीपीएल या कंपनीने याठिकाणी १० किलोमीटर अंतरातील गावांतील वाहनांकडून नियमबाह्य टोल वसुली केली आहे.
याप्रकरणी या कंपनीवर कडक कारवाई करुन आतापर्यंत त्यांनी केलेली टोलवसुली कंपनीकडुन वसुली करावी. त्याचबरोबर येणाऱ्या काळात टोलनाक्यापासुन १० किलोमीटर अंतरावरील गावांतील वाहनांकडुन टोल वसुली न करण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाने एसटीपीएल या कंपनीला द्यावेत. नळदुर्ग ते फुलवाडी येथील टोलनाका हे नऊ किलोमीटरचे अंतर आहे.त्यामुळे नळदुर्ग शहरांतील वाहनधारकांनी या टोलनाक्यावर टोल देऊ नये असे आवाहन करण्यात आले आहे. त्याचबरोबर ज्यासाठी हा टोल वसुल केला जात आहे त्या महामार्गाचे काम अद्याप पुर्ण झालेले नसताना तसेच सध्याच्या महामार्गावर खड्डेच खड्डे पडलेले असतांना या टोलनाक्यावर टोल वसुली का सुरू करण्यात आली याचीही चौकशी होणे गरजेचे आहे. अणदुर येथे टोल विरोधी कृती समिती स्थापन करण्यात आली असुन या समितीचे प्रमुख डॉ. जितेंद्र कानडे व त्यांचे सहकारी असल्याने त्यांना किंवा त्यांच्या आंदोलनाला सर्वांनीच आज पाठिंबा देऊन या टोलनाक्यावर सुरू असलेली नियमबाह्य टोलवसुली बंद करावी.