तुळजापूर/ काटी , दि .२१ : डाँ. सतीश महामुनी/ उमाजी गायकवाड
तुळजापूर पंचायत समितीच्या वतीने आदर्श गाव पाटोदाचे राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त माजी आदर्श सरपंच भास्करराव पेरे पाटील यांचे तालुक्यातील सरपंचांना मार्गदर्शन करण्यासाठी आदर्श गाव पाटोदा संकल्पना मार्गदर्शनपर शिबिराचे व सरपंचाच्या सत्काराचे आयोजन करण्यात आले होते.
तुळजापूर येथील पंचायत समिती सभागृहात पार पडलेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पंचायत समितीचे उपसभापती दत्तात्रय शिंदे होते. आयोजक दत्तात्रय शिंदे यांनी तालुक्यातील सरपंचांना त्यांची कार्य व कर्तव्ये समजली पाहिजेत, यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन केल्याचे सांगितले. यावेळी उपसभापती दत्तात्रय शिंदे यांच्या वतीने उपस्थित सर्व सरपंचांना ग्रामगीता, असा आमचा पाटोदा हे पुस्तक देऊन व सन्मानपत्र देवून गौरविण्यात आले.
यावेळी सरपंच बैठकीत मार्गदर्शन करताना भास्कर पेरे पाटील म्हणाले की, आपले गाव "आदर्श गाव" बनवायचे असेल तर प्रत्येक सरपंचानी प्रथम स्वतः स्वच्छता पाळण्याबरोबरच गावात कशी स्वच्छता राखता येईल याकडे लक्ष द्यावे, 'हात फिरे तिथे लक्ष्मी फिरे' म्हणतात त्याप्रमाणे आपआपल्या गावात 100 टक्के शौचालय झाली पाहिजेत, पाणी शुद्ध ठेवून त्याचा जमिनीत निचरा करा, फळझाडे लावा, 400 वर्षांपूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांनी वापरलेल्या शौचालयाचे मी रायगडावर जाऊन प्रथम समाधी स्थळाचे दर्शन न घेता शौचालयाचे दर्शन घेतल्याचे त्यांनी आवर्जून सांगत याचा अर्थ शिवकालीन काळात देखील शौचालयला अनन्यसाधारण झ्महत्त्व दिले जात होते. आदर्श गाव बनवण्यासाठी पहिले काम पिण्याचे पाणी शुद्ध करणे, दुसरे काम वापरलेले सांडपाणी पाणी जमिनीत मुरविले पाहिजे,तिसरे काम गावात व परिसरात फळांची झाडे लावणे, व स्वच्छता राखणे, गावातील निराधारांना आधार दिला पाहिजे, गावात मुलांना चांगले शिक्षण मिळायला पाहिजे अशी यशाची पंचसूत्री सांगून आदर्श गाव पाटोदा गावात चार प्रकारच्या पाण्याची व्यवस्था असून त्याठिकाणी विविध योजनांची अंमलबजावणी करुन जगात आदर्श घालून दिल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
आपल्या गावाचा विकास हेवेदावे बाजूला सारून आपणच करु शकतो. त्यासाठी शासनावर अवलंबून राहण्याची आवश्यकता नाही. सध्या सरपंचावरील नागरिकांचा विश्वास उडाल्याची खंत व्यक्त करून सरपंचांनी सर्वांना विश्वासात घेऊन अत्यंत प्रामाणिकपणे, निस्वार्थपणे व पारदर्शक पद्धतीने गावाचा कारभार केल्यास गावातील लोक सरपंचावर विश्वास ठेवतील असा आशावाद व्यक्त केला .यास गावकऱ्यांनीही 100 टक्के कर भरून ग्रामपंचायतीला सहकार्य करणे हे त्यांचे प्रथम कर्तव्य आहे. तसेच सरपंच कोणत्याही पक्षाचा असु द्या तो सर्वांना सोबत घेऊन जाणारा असावा.
आजच्या काळात पद, पैसा,बुध्दीला किंमत नाही.तर तुम्ही तुमच्या सोबत किती जणाला घेऊन काम करता याला किंमत आहे. सर्वांना सोबत घेऊन काम केले तरच गाव समृद्ध होईल.सरपंचाने गावकऱ्यांना सुविधा पुरवणे हे सरपंचाचे आद्यकर्तव्य आहे. असेही यावेळी पेरे पाटलांनी सांगितले.
याप्रसंगी गटविकास अधिकारी डॉ. प्रशातसिंग मरोड, सभापती सौ. रेणूका इंगोले, रुग्ण कल्याण समितीचे सदस्य आनंद कंदले, सामाजिक कार्यकर्ते भिवा इंगोले, पंचायत समिती सदस्य कोरे , काटीचे सरपंच आदेश कोळी, गोंधळवाडीचे सरपंच राजाभाऊ मोठे, युवराज शिंदे,आदीसह तालुक्यातील सरपंच उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन जळकोटे तर आभार कृषी विस्तार अधिकारी तांबोळी यांनी मानले.