तुळजापूर, दि .२७ :
येथील महालोक अदालती मध्ये 192 प्रकरणात शनिवारी दि . २५ सप्टेंबर रोजी तडजोड झाली आहे.
तुळजापूर येथील न्यायालयात राज्य विधी सेवा प्राधिकरण आणि जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांच्या निर्देशानुसार तालुका विधी सेवा समितीच्या वतीने महालोक अदालत घेण्यात आली. यामध्ये 3 हजार 800 प्रकरणे ठेवण्यात आली होती. त्यापैकी 192 प्रकरणांमध्ये तडजोड झाली आहे. प्रलंबित प्रकरणांपैकी 47 दिवाणी , 120 फौजदारी प्रकरणात तडजोड झाली. बॅक वसूलीचे एक प्रकरण मिटले. तसेच धनादेश अनादर प्रकरणी फिर्यादी पक्षाला 17 लाख 44 हजार 583 रूपयांची वसूली झाली. तसेच महालोक अदालतीमध्ये बॅक वसूली प्रकरणामध्ये 4 लाख 42 हजार 39 रूपये वसूली झाली. दावापूर्व प्रकरणामध्ये बॅकेची 10 लाख 18 हजार 170 रूपयांची वसूली झाली आहे. 20 वर्षापूर्वीचे एक प्रकरण तसेच 10 वर्षा पूर्वीचे 3 प्रकरणे आणि पाच वर्षापूर्वीची 11 प्रकरणे अशी एकूण 15 प्रकरणे तडजोडीने निकाली काढण्यात आली.
किरकोळ फौजदारी स्वरूपाच्या प्रकरणामध्ये आरोपींना दंडात्मक शिक्षा होऊन 94 हजार 50 रूपयांचा दंड करण्यात आला. महालोक अदालतीचे उद्घाटन तालुका विधी सेवा समितीचे अध्यक्ष तथा दिवाणी न्यायाधीश व्ही.ए. अवघडे यांच्या हस्ते झाले. यावेळी सहदिवाणी न्यायाधीश एम.पी.जसवंत, सह दिवाणी न्यायाधीश आर.बी.खंदारे, गटविकासाधिकारी प्रशांतसिंह मरोड, जगदीश राऊत, तहसीलदार सौदागर तांदळे, सरकारी वकील अमोलसिद्ध कोरे, तुळजापूर विधीज्ञ मंडळाचे अध्यक्ष ॲड जयंत इंगळे, पोलीस निरीक्षक आदिनाथ काशीद, तामलवाडी येथिल सहपोलीस निरीक्षक एस.ए.पंडीत, नळदुर्ग नगरपालिकेचे मुख्याधिकारी लक्ष्मण राठोड आदी उपस्थित होते. कोरोना आजाराच्या पाश्वभूमीवर आवश्यक ती काळजी घेण्यात आली. तसेच सामाजिक अंतर ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या. सर्व न्यायालयीन कम॔चारी, विधी सेवा समितीचे कम॔चारी, वकील संघाचे सर्व सदस्य, न्यायालयात नेमणूक असलेले सर्व पोलीस कम॔चारी यांनी महालोक अदालत यशस्वी करण्यासाठी पुढाकार घेतला.