काटी ,दि .२७ :
शिक्षणक्षेत्रात मानाचा समजला जाणारा जिल्हास्तरीय शिक्षणरत्न पुरस्कार पिंपळा येथील श्री. विठ्ठल नरवडे यांना प्रदान करण्यात आला. एकता फाउंडेशन व संस्कृती प्रतिष्ठान उस्मानाबाद यांच्या वतीने यशवंतराव चव्हाण सभागृह उस्मानाबाद येथे याचे वितरण करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जि.प. अध्यक्षा अस्मिता कांबळे ,अप्पर जिल्हाधिकारी रूपाली आवले, डेप्युटी कंट्रोलर ज्ञानेश्वर वीर, अमित कदम ,राम मुंडे, अभिलाष लोमटे या मान्यवरांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला .
नरवडे यांनी शाळेत वैशिष्ट्यपूर्ण सहशालेय उपक्रमाच्या माध्यमातून आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. विद्यार्थ्यांचे शिक्षण सुलभ करणं, सतत नावीन्याचा शोध घेत राहणं ,ज्वलंत सामाजिक प्रश्नाच्या संदर्भात उपक्रम घेऊन शालेय उपक्रमातून समाज संदेश देणे, त्यांच्या या कार्याची दखल घेऊन त्यांना शिक्षकरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
राष्ट्रउभारणीच्या कार्यात शिक्षकांचे योगदान मोलाचे आहे. शिक्षणक्षेत्रात पवित्र भावनेने काम करून बालमनास ज्ञानाचे धडे देत ,संस्कारांची रुजवण शिक्षक करतात. कोरोना संकट काळात ही शिक्षकांनी आपले सामाजिकत्व सिद्ध केले आहे. समाज अभियंता म्हणून ओळखला जाणारा शिक्षकांना प्रेरणा देणं व दिलेली कौतुकाची थाप ही त्यांना उत्साह देते.याच उद्देशाने शिक्षकांना गौरविण्यात येते. विठ्ठल नरवडे हे ज्ञानाच्या धड्यायाबरोबरच विविध मूल्यांची रुजवण होण्यासाठी सतत मग्न असतात. पारंपरिकता व आधुनिकता यांचा समन्वय त्यांच्या कार्यात दिसून येतो. शिक्षण केवळ पुस्तकी न राहता बाहेरील जगाशी त्याचा संबंध जोडणे, वर्गाबाहेर घडणाऱ्या घडामोडींचे ज्ञान मुलांना देऊन मिळालेल्या ज्ञानाचा प्रत्यक्ष उपयोग होण्यासाठीचे उपयोजन कौशल्य त्यांच्यात उतरवण्यासाठी त्याचे दृढीकरण होण्यासाठी ते सतत प्रयत्नशील असतात. कोरोना काळात शाळा बंद असून गृहभेटी घेणे, ऑनलाईन व ऑफलाईन याद्वारे मुलांचे शिकणे चालू राहील यासाठी ते प्रयत्नशील आहेत.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अभिलाष लोमटे यांनी केले. याप्रसंगी प्रा.अभिमान हंगरगर, एम.डी. देशमुख, दिपक भराटे, राजसिंहा राजेनिंबाळकर, विशाल थोरात, ज्ञानेश्वरी शिंदे, विक्रम मोरे, मनोज पाटील आदीची विशेष उपस्थिती होती.