तुळजापूर , दि .२४ : उमाजी गायकवाड
तुळजापूर तालुक्यातील काटगाव पंचायत समिती गणातील धोत्रीचे कॉंग्रेसचे पंचायत समिती सदस्य शिवाजी साठे यांनी भाजपचे जिल्हाध्यक्ष नितीन काळे, उपसभापती दत्ता शिंदे, पंचायत समिती सदस्य चित्तरंजन सरडे आदीच्या उपस्थितीत उस्मानाबाद येथे भाजपमध्ये प्रवेश केला.
कॉंग्रेस आणि भाजपचे पंचायत समितीमध्ये नऊ-नऊ असे पक्षीय बलाबल असताना कॉंग्रेसचे पंचायत समिती सदस्य शिवाजी साठे यांचा भाजप प्रवेश म्हणजे आगामी येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कॉंग्रेससाठी धक्का मानला जात असून आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी आखलेली व्युह रचना यशस्वी झाल्याचे बोलले जात आहे.
शिवाजी साठे यांना पंचायत समितीचे उपसभापतीपदी निवड केली जाणार असल्याचे बोलले जात असून दोन महिन्यांपूर्वीच उपसभापतीपदी निवड झालेल्या तामलवाडी गणातील दत्ता शिंदे यांनी आपल्या उपसभापतीपदाचा राजीनामा पंचायत समितीचे सभापती सौ.रेणुका भिवाजी इंगोले यांचेकडे सुपुर्द केला आहे. उपसभापतीचा राजीनामा मंजुरी नंतर उपसभापतीपदाची निवड केली जाणार आहे.पंचायत समिती सदस्य शिवाजी साठे यांच्या पत्नी धोत्री गावच्या कॉंग्रेसच्या विद्यमान सरपंच आहेत. शिवाजी साठे यांना माजी आमदार मधुकरराव चव्हाण यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जात होते. मागील काही दिवसांपासून त्यांचा भाजपमध्ये प्रवेश होणार अशी चर्चा होती. अखेर गुरुवार दि. 23 रोजी उस्मानाबाद येथील भाजप कार्यालयात भाजपचे जिल्हाध्यक्ष नितीन काळे यांच्या प्रमुख उपस्थितीत त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.
यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष नितीन काळे, युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष राजसिंह राजेनिंबाळकर, उपसभापती दत्ता शिंदे, पंचायत समिती सदस्य चित्तरंजन सरडे, सिध्देश्वर कोरे, भिवाजी इंगोले,नागनाथ कलसुरे आदी उपस्थित होते.