काटी , दि . ०६ : उमाजी गायकवाड 

तुळजापूर तालुक्यातील काटी येथे बैलपोळा सण कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सलग दुसऱ्या वर्षीही साधेपणाने साजरा करण्यात आला. शेतकऱ्यांचा सोबती असलेल्या बैलांबाबत कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी व बैल पोळ्यानिमित्त येथील मानकरी माजी चेअरमन सयाजीराव विजयसिंह देशमुख यांनी आपल्या वाड्यासमोरील अंगणात बैलांना सजवून  त्यानंतर शिंगांना रंगरंगोटी, अंगावर झूल घालून पुरणपोळीचा नैवेद्य खायला देऊन कडबोळे शिंगांवर ठेवून त्यांची मनोभावे पूजा करून त्यांना पुरणपोळीचा नैवेद्य अर्पण करण्यात आला. 


त्यानंतर बैलांना चारा देण्यात आला. यावेळी बैलांची खांदेमळणी करुन बैलांच्या शिंगांणा छान रंग व बेगड लावून तसेच अंगावर झूल व बैलांच्या डोक्याला  बाशिंग, वेसन, मोरकी, कंडे, गळ्यात घुंगराची माळ, बैलांच्या अंगावर विविध रंगांचे ठसे उमटाउन बैलांची सजावट करण्यात आली होती. यंदा बैलांची ढोलताशांसह मिरवणूक न काढता बैलपोळा सण साधेपणाने साजरा करण्यात आला.

      
यावेळी माजी चेअरमन सयाजीराव देशमुख, धनाजी थिटे, मधुकर ताटे,नानासाहेब लोहार, सत्यवान बोराडे, विष्णु कांबळे आदीजण उपस्थित होते.
 
Top