तुळजापूर / काटी , दि १९ :
केंद्र सरकारच्या विरोधात प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढलेल्या महागाईमुळे गोरगरिबांना हैराण करणारी परिस्थिती निर्माण झाली आहे, केंद्रातील भाजपाचे सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या चुकीच्या धोरणामुळे सत्तर वर्षात काँग्रेसने उभा केलेला मजबूत देश विकलांग होत आहे, सुरक्षित जीवन जगणारा सामान्य माणूस चुकीच्या धोरणामुळे आज कंगाल बनला आहे, अशी घणाघाती टीका तुळजापूर पंचायत समितीचे माजी सभापती शिवाजीराव गायकवाड यांनी काटी ता. तुळजापूर येथे केली.
महाराष्ट्रभर काँग्रेस पक्षाच्या नेतृत्वाखाली काम करणाऱ्या प्रदेश काँग्रेस सेवादलाचे प्रदेशाध्यक्ष विलास अवताडे यांच्या वतीने प्रत्येक रविवारी जनसंवाद कार्यक्रम ( रवि मिलन) काटी येथे आयोजित होता. सोशल डिस्टन्स आणि मास्क या शासनाच्या नियमांचे पालन करीत या जलसंपदामध्ये माजी सभापती शिवाजीराव गायकवाड यांनी केंद्र सरकार गरीब माणसाला न्याय देत नसल्याचे टीका केली. सातत्याने आपत्तीमध्ये सापडलेला माणूस मदतीपासून वंचित आहे, हे देखील केंद्र सरकारचे अपयश आहे, असे गायकवाड म्हणाले.
यावेळी माजी सभापती शिवाजी गायकवाड, सेवादल काँग्रेसचे अध्यक्ष तानाजी जाधव , काँग्रेस सेवादलाचे युवक नेते सुजित हंगरकर, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सयाजीराव देशमुख, जेष्ठ नेते मोतीराम आगलावे , सिकंदर कुरेशी, अहमद पठाण, नामदेव काळे, शिवलिंग गाहणे, विकास हंगरकर, उतम काटे, सयाजीराव चिवरे, मनोज हंगरकर, भैरू काळे ग्रामस्थ उपस्थित होते.
काटी येथे केंद्र सरकारचे अपयश आणि त्याचा लोकांना होणारा त्रास या अनुषंगाने ग्रामस्थांशी संवाद साधला. यावेळी गॅस ,पेट्रोल भाव वाढ झाल्यामुळे सर्व क्षेत्रात प्रचंड महागाई झाली आहे. त्यामुळे गोरगरीब लोकांना दोन वेळा जेवण करणे देखील अवघड झाले आहे, जीएसटी मुळे व्यापारी आणि देशाचे अर्थकारण बिघडले आहे, शेतकऱ्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊन देखील शेतकरी वर्ग पिक विमा पासून वंचित आहे, जिल्ह्यात माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांनी आपल्या सत्ता काळात शेतकऱ्यांना न्याय दिला, आजही चव्हाण हे शेतकऱ्यांना पिक विमा मिळण्यासाठी पत्रव्यवहार करीत आहेत असे यावेळी माजी सभापती शिवाजी गायकवाड यांनी सांगितले.
या काळात केंद्र सरकारच्या वतीने चुकीचे धोरण राबविल्यामुळे देशभर महागाईचा भडका उडाला आहे. याचा परिणाम सर्व स्तरातील नागरिकांना महागाईचा फटका बसत आहे . त्या अनुषंगाने लोकांशी संवाद साधण्यात आला. यावेळी जनसंवादाची प्रास्ताविक काँग्रेसचे नेते सुजित हंगरकर यांनी करीत असताना काँग्रेसच्या कालावधीमध्ये देशाचा विकास खूप मोठ्या प्रमाणात झाला आहे. तुलनेमध्ये भाजप आणि केवळ नाव बदलून काँग्रेसचे योजना पुढे चालवली असल्याचे सांगितले. आभार सयाजी देशमुख यानी मानले.