काटी , दि . २९
तुळजापूर तालुक्यातील सावरगाव येथील साठवण तलाव धोकादायक झाला असून साठवण तलावाच्या भरावाच्या लांबीस वरच्या बाजूला समांतर भेगा पडल्याचे तलावा शेजारील शेतकरी नेताजी कदम यांच्या निदर्शनास आले. ही बाब अनेकांच्या निदर्शनास आल्यानंतर शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
साठवण तलावाच्या भरावाच्या दोन्ही बाजूंनी बाबळीसह अन्य झाडाझुडुपांनी भरावर झाडांची गर्दी दिसून येत आहे. संबंधित विभागाने या विषयाकडे तातडीने लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे.
मागील आठवडाभरा पासून कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळे सावरगाव येथील साठवण तलाव पुर्ण क्षमतेने भरला असून सांडवा ओसंडून वाहू लागला आहे. 1999 साली पाटबंधारे विभागाअंतर्गत या तलावाची निर्मिती करण्यात आली होती. तेंव्हापासून या परिसरातील पिण्याच्या पाण्याचा व शेतीच्या पाण्याच्या प्रश्न काही अंशी मिटला आहे. गेल्या दोन वर्षांपासून हा तलाव पूर्ण क्षमतेने भरत असल्यामुळे शेतकऱ्यांतून समाधान व्यक्त केले जात आहे. मात्र, तलावाच्या भरावाच्या मध्यभागातून उभे समांतर तडे गेल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. तलावाच्या भरावावर मोठ-मोठे झाडे आल्यामुळे झाडा झुडूपांनी भराव वेढल्याचे दिसून येत आहे. झाडांची दाटी वाढल्याने वन्यप्राण्यांचा वावर वाढला आहे.
सध्या पावसाळ्याचे दिवस असून तलाव पूर्ण क्षमतेने भरल्यामुळे तलावाच्या पाळूला दाब निर्माण झाला आहे. तलावावरील पाळूचे तडे प्रकर्षाने जाणवत असल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. संबंधित विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी संभाव्य धोका ओळखून याकडे तातडीने लक्ष देऊन उपाययोजना करण्याची गरज आहे.
दोन-तीन दिवसांपासून सांडवा वाहत आहे. माझी शेती तलावाशेजारीच आहे. तळ्याच्या भरावाला मोठ्या भेगा पडल्या आहेत. झाडांची गर्दी झाल्याने डुकरांचा त्रास वाढला आहे.
नेताजी कदम, शेतकरी -सावरगाव
काल गावातील नागरिकांनी तलावाच्या पाण्याची पूजा केल्याचे फोटो पहिले होते. मात्र, तलावाच्या पाळूला तडे गेल्याचे कोणी सांगितले नाही. किंवा कोणी तक्रार केलेली नाही. मी सावरगावला जाऊन प्रत्यक्ष तलावाची पाहणी करणार आहे. संभाव्य धोका लक्षात घेता तात्काळ उपाय-योजना केल्या जातील.
जे.डी.गुरव, उपविभागीय अभियंता पाटबंधारे विभाग - तुळजापूर