काटी , दि .०६
तुळजापूर तालुक्यातील काटीसह परिसरात बैल पोळ्याच्या पूर्वसंध्येला रात्री झालेल्या पावसाने येथील शेतकरी मोईजोद्दीन अलिमोद्दीन इनामदार यांच्या गट नं. 608 मधील दोन एकर क्षेत्रावरील ऊस पिकाचे अतोनात नुकसान झाले आहे.
सध्या उसाकडे नगदी पीक म्हणून पाहिले जाते. अशावेळी पावसामुळे झालेले नुकसानीमुळे शेतकऱ्यांना चिंतेत टाकणारी असल्याचे चर्चिले जात आहे. रात्रभर पडलेल्या पावसामुळे उभा ऊस आडवा पडला आहे. मागील दोन दिवसांपासून पडत असलेल्या पावसामुळे साठवण तलाव, ओढ्यांना,नाल्यांना पाणी वाढत असल्याने शेतकरी समाधान व्यक्त करीत असले तरी एकीकडे नव्याने कांदा लागवड केलेली रोपे पावसाने अक्षरशः वाहून गेली आहेत. उडीद, भाजीपाला पिकांचे नुकसान झाले आहे. तर गावातील जुनी माळवदाची घरे पडली आहेत तर अनेकांच्या घरांना गळती लागली आहे.
हवामान खात्याने येत्या चार-पाच दिवसात पाऊस पडण्याचा इशारा दिला आहे. पावसामुळे झालेल्या नुकसानीचा पंचनामा करून मदत मिळण्याची अपेक्षा शेतकऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे.