नळदुर्ग , दि .५: सुहास येडगे
नळदुर्ग नगरपालिकेच्या नगराध्यक्षांच्या मनमानी कारभाराची चौकशी करण्याबरोबरच शहरांतील नागरीकांना सुविधा मिळवुन द्याव्यात अशी मागणी आमदार सुरेश धस यांनी धारशिवचे जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांना पाठविलेल्या पत्रात केली आहे.
नगरसेवक नय्यर जहागिरदार व पत्रकार आयुब शेख यांनी दिलेल्या निवेदनाची दखल घेत आमदार सुरेश धस यांनी दि.४ सप्टेंबर २०२१ रोजी जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांना याबाबतचे पत्र दिले आहे. या पत्रात आमदार सुरेश धस यांनी म्हटले आहे की, नळदुर्ग नगरपालिकेच्या नगराध्यक्षा यांचा कारभार मनमानी व लोकशाही विरोधी असुन नियमबाह्य पद्धतीने काम करणे असा असुन नगराध्यक्षांचे नातेवाईक हे घटनाबाह्य सत्ताकेंद्र असल्यामुळे त्यांच्या हस्तक्षेपामुळे विकास कामांना खीळ बसलेली आहे.
यामुळे न.प.ची मोठी आर्थिक हानी होत आहे. नळदुर्ग शहरातील साफसफाई कामाची निविदा डिसेंबर २०२० मध्ये संपली असुन सदस्यांच्या मागणीकडे दुर्लक्ष करीत १० टक्के अधिकाराचा दुरुपयोग करून त्याचा १०० टक्के वापर करून निविदा या सर्वसाधारण सभेत न आणता अध्यक्षा निविदा काढत आहेत. हुतात्मा निलय्या स्वामी उद्यानाचे विकासकाम केवळ २५ ते ३० टक्के झाले असुनही ठेकेदाराला जादा रक्कम दिली आहे.तरीही एक वर्षांपासुन हे काम अर्धवट अवस्थेत रखडलेले आहे. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या योजनेच्या फिल्टर टाकी, पंप हाऊसच्या ठिकाणी आवश्यक कामे पुर्ण केलेली नसुन निवेदेतील नमुद क्षमतेपेक्षा कमी क्षमतेचे वीज पंप बसवुन देयके काढण्यात आले आहेत. रोकड्या हनुमान मंदिर विकास काम हे निकृष्ठ दर्जाचे करण्यात आले असुन यामध्ये निधीचा गैरव्यवहार होऊन आर्थिक घोटाळा झालेला आहे. या सर्व प्रकरणांची तात्काळ चौकशी करून योग्य ती कार्यवाही करावी असेही आमदार सुरेश धस यांनी या पत्रात म्हटले आहे. त्याचबरोबर भवानीनगर ते राहिमनगर या रस्त्याचे काम अर्धवट अवस्थेत असल्यामुळे नागरीकांना रहदारीसाठी मोठ्याप्रमाणावर अडचणी येत आहेत. तसेच याठिकाणी पिण्याचे पाणी अशुद्ध स्वरूपात पुरवठा केला जात असुन याठिकाणी घाणीचे साम्राज्य पसरले असल्याच्या नागरीकांच्या तक्रारी प्राप्त आहेत या सर्व समस्या दुर होण्यासाठी योग्य ती कार्यवाही करावी अशी मागणीही या पत्रात आमदार सुरेश धस यांनी केली आहे.
आमदार सुरेश धस यांच्या या पत्रामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. आता जिल्हाधिकारी याबाबत काय निर्णय घेतात याकडे नळदुर्ग शहरवासीयांचे लक्ष लागले आहे.