अक्कलकोट दि.११
तालुक्यात ई पीक पाहणी मोबाईल ॲप प्रकल्पास अक्कलकोट तालुक्यातील शेतकरी वर्गातून चांगला प्रतिसाद मिळत आहे. जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, सहाय्यक जिल्हाधिकारी मनीषा आव्हाळे,
प्रांताधिकारी सुप्रिया डांगे, यांच्या मार्गदर्शनाखाली तहसीलदार बाळासाहेब सिरसट यांच्या माध्यमातून सध्या तालुक्यातील वीस टक्के काम झाले असून, उर्वरीत काम प्रगतीपथावर आहे.
ई पीक पाहणी प्रकल्पाला शेतकरी वर्गाचा चांगला प्रतिसाद आहेच शिवाय तहसीलदार बाळासाहेब सिरसट हे स्वतः तालुक्यातील विविध भागात पाहणी व मार्गदर्शन दौरे करत असून, प्रत्यक्ष ग्राऊंडवर महसूल विभागाचे कान नाक डोळे समजले जाणारे कोतवाल हे हिरहिरीने कामकाज करत असून, तसेच महसूल विभागाचे अधिकारी, मंडळ अधिकारी, तलाठी, पोलीस पाटील, महा ई सेवा केंद्र चालक, ग्रा प ऑपरेटर, हे देखील शेताच्या बांधावर जाऊन शेतकऱ्यांना मार्गदर्शन करत आहेत. खरीप हंगाम अंतिम टप्प्यात आल्याने पिकांच्या काढणी पूर्वी पीक पेरा ऑनलाईन भरणे करिता शेतकरी लगबग करताना दिसत आहे.
मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम सुरू करण्यात आला असून, या ई पीक पाहणी मोबाईल ऍप च्या वापरामुळे शेतकऱ्यांच्या पीक पाहणी बाबतच्या सर्व अडचणी दूर होतील. त्यासाठी तालुक्यातील सर्व शेतकरी खातेदार यांनी ऍप डाऊनलोड करून वापरावे, आपले पीक पाहणी ऑनलाईन न केल्यास शेतकऱ्यांना खलील अडचणींना सामोरे जावे लागले
१) आपले शेत पडीक दाखविले जाईल, किंवा पेरणी झालीच नाही असे दाखविले जाईल.
२)बँकांकडून पीककर्ज घेताना अडचणी निर्माण होईल
३) प्रधानमंत्री पीक विमा योजना मिळणार नाही.
४) शासनाद्वारे एखाद्या पिकाला आर्थिक मदत जाहीर झाली तर आपण आपली पीक नोंदणी न केल्यास शासनाद्वारे मिळणारी मदत आपल्याला मिळणार नाही.
५) जर तुमच्या शेतातील पिकांचे जंगली जनावरांपासून नुकसान झाले तर आपण पीक नोंदणी न केल्याने आपल्याला कुठल्याही प्रकारची आर्थिक मदत मिळणार नाही. त्यामुळे तालुक्यातील सर्व शेतकरी यांनी ई पीक पाहणी करणे आवश्यक असून, आपल्या पिकाचा अक्षांश रेखाश सह फोटो अपलोड करून पीक पेरा ऑनलाईन नोंदवावा असे आवाहन तहसीलदार बाळासाहेब सिरसट यांनी केले आहे.