तुळजापूर , दि.१५
तुळजापूर तालुक्यातील काक्रंबावाडी या छोट्याशा निसर्गाच्या कुशीत आणि गावच्या तिन्ही बाजूने डोंगर असणाऱ्या गावात काक्रंबावाडी येथील तरुण पक्षीप्रेमी महेश कोळेकर यांच्या प्रमुख नेतृत्वाखाली राबवला गेला एक अनोखा उपक्रम, घरटे संवर्धन करू, पर्यावरणाची कास धरू.
आजकाल पक्ष्यांचे प्रमाण खूप कमी होत चालले आहेत. त्याला कारणेही ही अनेक प्रकारची आहेत. वृक्ष तोड, जंगलातील मोठं मोठे आगीचे वणवे, मानवनिर्मित हानी अशा विविध कारणांमुळे पक्ष्यांचे जीवन धोक्यात आले आहे. घरटे तुटल्यामुळे किंवा घरटे नसल्यामुळे आज कित्येक पक्षांचे जीवन आणि प्रजाती नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. पक्षाचे संवर्धन करणे आणि त्याच बरोबर त्यांच्या घरट्यांचे ही संवर्धन करणे काळाची गरज बनली आहे.
ज्या प्रमाणे मानवाला निवास करण्यासाठी एका चांगल्या घराची गरज असते. त्याचप्रमाणे त्या मुक्या पक्षांना घरट्यांची गरज असते. आजकाल आपण पाहतो की वृक्षतोडी मुळे या पक्ष्यांचे जीवमान खूप धोक्यात येऊ लागले आहे. याच गोष्टींवर आळा घालण्यासाठी महेश कोळेकर यांनी काक्रंबावाडी गावातील लोकांना वृक्षारोपण , वृक्षसंवर्धन , पक्षीसंवर्धन आणि घरटे संवर्धन करण्याचे आवाहन करण्यात आले.
या उपक्रमाला काक्रंबावाडी गावातून खूप मोठ्या प्रमाणात सक्रिय असा प्रतिसाद मिळत आहे. गावातील सर्व शेतकरी आपआपल्या शेतातील वृक्षांची आणि घरट्यांची काळजी घेत आहेत. अनेक झाडांवर घरटे आणि पाण्याची ही व्यवस्था करण्यात आली आहे. आज या उपक्रमाचे आणि महेश कोळेकर यांच्या या अनोख्या उपक्रमाचे सर्व पर्यावरणप्रेमी आणि पक्षीप्रेमी कडून कौतुक होत आहे. महेश कोळेकर यांना काक्रंबावाडी गावातील लोक पक्षीप्रेमी या नावाने ओळखू लागले आहेत.