काटी , दि .१८: उमाजी गायकवाड
तुळजापूर तालुक्यातील काटी येथील जिल्हा परिषद प्रशाला सुंदर माझे कार्यालय या उपक्रमात उस्मानाबाद जिल्ह्यात प्रथम आली आहे.
विभागीय आयुक्त सुनिल केंद्रेकर यांच्या संकल्पनेतून संपूर्ण मराठवाड्यात हा उपक्रम राबविण्यात येत आहे. उस्मानाबाद जिल्ह्यात राबविण्यात आलेल्या सुंदर माझे कार्यालय 2020-21 अभियानात काटी ता .तुळजापूर येथील जिल्हा परिषद प्रशाला जिल्ह्यात सर्वोत्कृष्ट ठरली आहे.
शुक्रवारी मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचे औचित्य साधुन जिल्हा परिषदेतील यशवंतराव चव्हाण सभागृहात विविध विभागातील अधिकारी कर्मचारी यांचा सन्मान सोहळा जिल्हा परिषदेच्या वतीने आयोजित करण्यात आला होता.
याप्रसंगी प्रबोधनकार केशव ठाकरे यांच्या जयंती निमित्त प्रथमतः जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा अस्मिता कांबळे यांच्या शुभहस्ते व अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अनिलकुमार नवाळे यांच्या उपस्थितीत प्रबोधनकार केशव ठाकरे यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला.
सुंदर माझे कार्यालय अभियान 2020-2021 अंतर्गत जिल्हा परिषदेच्या वतीने विविध विभागातील अधिकारी व कर्मचारी यांना सन्मानित करण्यात आले. विभागीय आयुक्त औरंगाबाद यांच्या संकल्पनेतून सुंदर माझे कार्यालय अभियान 2020-21 हा उपक्रम कार्यान्वित करण्यात आला होता. या उपक्रमात तुळजापूर तालुक्यातील काटी येथील जिल्हा परिषद प्रशाला या शाळेने आपला सहभाग नोंदवला होता. या अभियानांतर्गत गेल्या वर्षभरात कार्यालयीन स्वच्छता, अंतर्बाह्य स्वच्छता, कार्यालयीन रंगरंगोटी, वृक्षारोपण, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, गुणवत्ता विकास शालेय रेकॉर्ड, मियावाकी जंगल, तंबाखू मुक्त शाळा, मिनी सायन्स लॅब, स्पर्धा परिक्षा आदी महत्त्वाच्या बाबी लक्षात घेऊन काटी येथील जि.प. प्रशाला या उपक्रमात सर्वोत्कृष्ट ठरली. त्यामुळे जि. प. अध्यक्षा अस्मिता कांबळे व अनिलकुमार नवाळे यांच्या हस्ते शाळेचे मुख्याध्यापक सय्यद अहमद व सर्व शिक्षक वृंद यांना सन्मान चिन्ह व प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
विद्यार्थ्यांच्या वैयक्तिक व परिसर स्वच्छतेसाठी शाळेतील प्रत्येक शिक्षकांनी घेतलेल्या कठीण मेहनतीचे हे फळ असल्याची व शाळेतील माझे सहकारी शिक्षक शिवाजी राठोड, गुरुप्रसाद भुमकर, संगिता सुरवसे, हनुमंत कदम, संजयकुमार भालेराव, व कनिष्ठ सहाय्यक, श्रीकांत पांडे ,सेवक मल्लिकार्जुन घोडके या सर्व सहकाऱी कर्मचाऱ्यांच्या प्रयत्नातून हे यश मिळाले असल्याचे प्रशालेचे मुख्याध्यापक अहमद सय्यद यांनी सांगितले.