नळदुर्ग , दि .१८:   सुहास येडगे 

नगरपालिकेत एक रुपयाचाही गैरव्यवहार झालेला नाही. विरोधकांनी केवळ कागदी घोडे नाचवित आमच्यावर गैरव्यवहार केल्याचा आरोप करू नये. विरोधकांनी आम्ही गैरव्यवहार केल्याचे सिद्ध करून दाखविले तर मी राजकीय संन्यास घेईन असे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश कार्यकारीणी सदस्य अशोक जगदाळे यांनी पत्रकार परिषदेत बोलतांना म्हटले आहे.


 नगरपालिकेत राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता आहे. आमच्या भगिनी रेखाताई जगदाळे या नगराध्यक्षा आहेत. गेल्या चार वर्षात राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातुन आम्ही शहराचा प्रामाणिकपणे विकास करण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र ज्यांना शहरवासियांनी नाकारले त्या विरोधकांनी कांही ठेकेदारांना समोर करून विकास कामांना खीळ घालण्याचा प्रयत्न केला आहे. वास्तविक पाहता विरोधकांनी शहर विकास कामात आम्हाला सहकार्य करणे गरजेचे होते. सन २०१८ पासुन विविध कामांच्या निविदा आम्ही काढल्या मात्र प्रत्येक वेळी विरोधकांनी कांही ठेकेदाराना हाताशी धरून कामाचे टेंडर कमी दराने भरायचे व ते कामच पुन्हा करायचे नाही. असा प्रकार गेल्या चार वर्षात अनेकदा केला आहे. शहर विकास कामात कोण अडथळा आणत आहे हे शहरातील प्रत्येक नागरीकांना माहीत आहे. 


हुतात्मा निलय्या स्वामी उद्यान तसेच रोकड्या मारुती मंदिर परिसरात जितके काम करण्यात आले आहे तेवढ्याच कामाचे बील संबंधित ठेकेदाराला देण्यात आले आहे. न.प.च्या अभियंत्यांने जितक्या कामाची एम. बी. करून बील सादर केले आहे तितक्याच कामाचे बील त्या ठेकेदाराला देण्यात आले आहे. या दोन्ही कामात गैरव्यवहार हा झालेला नाही तरीही विरोधक या कामामध्ये गैरव्यवहार झाल्याचे धांदातपणे खोटे सांगत आहेत. असे अशोक जगदाळे यांनी म्हटले आहे विरोधकांनी गैरव्यवहार झाल्याचे सिध्द करून दाखविले तर मी राजकीय संन्यास घेईन. गैरव्यवहार करणे हे आमच्या रक्तात नाही. नगरपालिकेने विकास कामांचे टेंडर काढल्यानंतर ते टेंडर कोण भरते, ते टेंडर कुणाच्या सांगण्यावरून कमी दराने भरले जाते याची पोलिसांकडुन चौकशी झाली तर शहर विकासाचे खरे मारेकरी कोण हे समोर येईल. सध्या नगरपालिका तिजोरीत जवळपास ६ कोटी रुपये शिल्लक आहेत. या सहा कोटी रुपये खर्चाच्या २२ कामांचे टेंडर सध्या काढण्यात आले आहे. टेंडर भरण्याची मुदत संपली असुन येत्या दोन चार दिवसात टेंडर प्रक्रिया पुर्ण होऊन ही सर्व कामे सुरू करण्यात येणार आहेत. मात्र यावेळी मागच्यासारखेच विरोधकांनी या कामांमध्ये खोडा घालु नये असेही अशोक जगदाळे यांनी म्हटले आहे. 



जलशुद्धीकरण केंद्रात झालेल्या कामातही कुठलाच गैरव्यवहार झाला नाही त्याठिकाणी काम चांगले झाले म्हणुन गेल्या चार वर्षात एकदाही पाण्याच्या मोटारी जळालेल्या नाहीत. आपली पाणीपुरवठा यंत्रणा जुनी असल्याने दुर्दैवाने आपल्याला शहरात दररोज पाणीपुरवठा करता येत नाही. यासाठी १ कोटी २० लाख रुपये खर्चाची नवीन पाण्याची टाकी बांधण्याचे काम आपण हाती घेतले असुन त्याची मंजुरीही आपल्याला मिळालेली आहे असेही अशोक जगदाळे यांनी म्हटले आहे. विरोधक एकीकडे म्हणतात निधी खर्च झाला नाही तर दुसरीकडे हेच विरोधक आमच्यावर गैरव्यवहार केल्याचा आरोप करीत आहेत. जर निधीच खर्च झाला नसेल तर गैरव्यवहार कसा होणार असा प्रश्न ही जगदाळे यांनी उपस्थित केला आहे. नगरपालिकेत सत्तेत असताना ज्यांनी अनेक योजनांचा बट्ट्याबोळ केला तीच मंडळी आज आमच्यावर आम्ही गैरव्यवहार केल्याचा आरोप करून स्वताचे हसे करून घेत आहेत. कोट्यवधी रुपयांचे कामे घेऊन ते कामे न करणारे ठेकेदार कुणाचे चमचे आहेत किंवा या ठेकेदारांच्या पाठीमागे कोण आहे हे शहरवासियांना माहीत आहे असेही अशोक जगदाळे यांनी म्हटले आहे.


१२०६ घरांची घरकुल योजना कुणी बुडविली, हे कुणाचे पाप आहे, गरीब, भोळ्या--भाबड्या जनतेला कुणी लुटले आहे हेही जनता विसरलेली नाही असेही अशोक जगदाळे यांनी म्हटले आहे.त्यामुळे विरोधकांनी केवळ नगरपालिका निवडणुक डोळ्यासमोर ठेऊन आमच्यावर खोटे तसेच बिनबुडाचे गैरव्यवहाराचे आरोप करू नयेत. विरोधकांनी आम्ही गैरव्यवहार केल्याचे सिद्ध करून दाखविल्यास मी राजकीय संन्यास घेईन असेही अशोक जगदाळे यांनी म्हटले आहे.
 
Top