ताज्या घडामोडी

 
काटी, दि . १७: 

 तुळजापूर  तालुक्यातील पिंपळा (बु.) येथील वृध्द शेतकरी संदीपान बलभीम चुंगे वय ७२ वर्ष   हे आपल्या शेतातील बांधावरुन पायी चालत जात असताना अतिशय विषारी समजल्या जाणाऱ्या घोणस जातीच्या सापाने पायाला दंश केला. ही घटना सोमवार दि. 13 रोजी घडली. घटना घडताच त्यांना उपचारासाठी तात्काळ सोलापूर येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. 

मागील चार दिवस ते मृत्युशी झुंज देत होते.अखेर गुरुवार दि. 16 रोजी त्यांची प्राणज्योत मालवली. गावात त्यांना हाडाचे शेतकरी, शेतीविषयक कुशल मार्गदर्शक, शांत,संयमी व्यक्ती म्हणून त्यांची ख्याती होती. ते स्वतः निरक्षर असूनही मुलगा रामहरी व विनोद यांना चांगले शिक्षण देऊन नौकरीस लावले. पिंपळा (बु.) येथील 20 दिवसातील दुसरी घटना असून 20 दिवसांपुर्वी भाऊराव पांडा पाटील यांचाही सर्पदंशाने मृत्यू झाला होता. 20 दिवसांत एकाच गावात दोघांचा सर्पदंशाने मृत्यू झाल्याने शेतकऱ्यांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. 
       
संदीपान चुंगे यांच्या पार्थिवावर शुक्रवारी सकाळी अकरा वाजता  पिंपळा (बु.) येथील हिंदू स्मशानभूमीत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.
 त्यांच्या पश्चात पत्नी,दोन मुले,दोन मुली, सुना, नातवंडे  परिवार आहे.
 
Top