नळदुर्ग, दि . ३० : 


 श्री  तुळजाभवानी शेतकरी सहकारी साखर कारखाना १५ वर्षाच्या दिर्घ मुदतीवर  भाडेतत्वावर चालविण्यास दिल्यामुळे  येणारा गळीत हंगाम विनाविलंब व विनातक्रार सुरू होऊन शेतकऱ्यांना चांगला भाव मिळेल अशी आपेक्षा व्यक्त केली जात आहे..


उस्मानाबाद जिल्हा मध्यवर्ती बँक व कामगार भविष्य निर्वाह निधी विभागाने येथील श्री तुळजाभवानी शेतकरी सहकारी साखर कारखाना भाडेतत्वावर देण्यास हिरवा कंदील दाखविल्याने हा कारखाना  सोलापूर जिल्ह्यातील धोत्री येथील गोकुळ शुगर इंडस्ट्रीजला 15 वर्षासाठी भाडेतत्त्वावर देण्यासाठीचा प्रोसिडींग  मान्यतेसाठी सहकार मंत्र्यांकडे पाठविण्यात आले आहे.


तुळजाभवानी साखर कारखान्याचे  10024 सभासद संख्या असलेला व 11 हजार हेक्टर वर जवळपास 8 लाख टन ऊस उपलब्ध असलेला हा कारखाना सन 2012 - 13 गळीत हंगामापासून बंद आहे. हा कारखाना बॅंक कर्ज व कामगार भविष्य निर्वाह निधीच्या देणी रक्कमेमुळे भाडेतत्त्वावर देता येत नव्हता. भविष्य निर्वाह निधी विभागाने सदर कारखान्याला कुलूप ठोकले आहे. तर कारखान्यावर मार्च 2018 पासून अवसायक नियुक्त आहे. दरम्यान शासनाने हा कारखाना भाडेतत्त्वावर देण्यासाठी परवानगी दिल्याने कारखान्याने प्रसिद्ध केलेल्या निविदा नोटीस प्रमाणे आठ इच्छुकांनी अर्ज खरेदी केले होते. 


धोत्री ता. दक्षिण सोलापूर येथील गोकुळ शुगर इंडस्ट्रीज लिमीटेड यांनी निवीदा भरल्या होत्या. सदर निविदा  साखर आयुक्त कार्यालयात खुल्या केल्या असता गोकुळ शुगर इंडस्ट्रीजने जादा दराने निविदा भरल्याने ती मंजूर करण्यात आली आहे. 


तुळजाभवानी साखर कारखाना भाडेतत्त्वावर दिल्यामुळे कारखान्यास तीन कोटी ठेव शिवाय वार्षिक स्थिर भाडे एक कोटी व गाळपानुसार मिळणारे अंदाजे 2.5 कोटी मिळणार आहेत. शिवाय असवानी (डिस्टलरी) प्रकल्पापासून दरवर्षी 50 लाख भाडे व प्रती लिटर स्पिरीट करीता दोन रूपये मिळणार आहेत. डिस्टलीरीची क्षमता प्रतीदिन 30 हजार लिटर तर कारखान्याची गाळप क्षमता प्रतीदिन 12 हजार 500 मेट्रिक टन इतकी आहे.


सदर कारखाना भाडेतत्त्वावर दिल्यामुळे संपूर्ण भाडे व प्रतीदीन  गाळपानुसार मिळणारी रक्कम बॅंकेला कर्जा पोटी परस्पर दिली जाणार आहे.
तीन कोटी ठेव रक्कमेतून जवळपास अडीच कोटी रक्कम कामगार भविष्य निर्वाह निधी कडे वर्ग केले जाणार आहे सदर रक्कम मिळाल्या नंतरच कामगार भविष्य निर्वाह निधी विभाग कुलूप काढणार आहे. असवानी प्रकल्पाच्या भाड्यातून व स्पिरीट डिस्टलीरी नुसार मिळालेल्या रकमेतून  कामगारांच्या थकलेल्या पगारी, भत्ते यावर 5 कोटी तर शासकीय देणी करीता 5 कोटी खर्च करून उरलेली रक्कम पुन्हा बॅंक कर्जाकडे वळती केली जाणार आहे.
भाडेतत्त्वावर कारखाना घेऊन अर्ध्यात करार मोडीत काढण्याच्या प्रकारामुळे या कारखान्याला घरघर लागली होती. सदर कारखाना दिर्घ मुदतीच्या म्हणजे 15 वर्षाच्या काळाकरीता भाडेतत्त्वावर दिल्यामुळे पुन्हा तुळजापूर तालुक्यातील सहकार क्षेत्राला बळकटी मिळणार आहे.


 
Top