नळदुर्ग , दि . ५

येथिल भुईकोट किल्ल्यातील  नयनरम्य नर-मादी हा धबधबा  रविवार दि. ५ सप्टेंबर   रोजी दुपार पासुन  सुरू झाला आहे. शनिवारी  झालेल्या  जोरदार पावसामुळे   तिर्थक्षेत्र तुळजापूर व नळदुर्ग शहराला पाणी पुरवठा होणारा बोरी धरण पुर्णक्षमतेने भरून सांडवे सुरू झाल्याने हा  धबधबा सुरू झाला आहे. गतवर्षी धबधबा सुरु झाला होता. माञ कोरोनामुळे हा किल्ला  बंद असल्याने पर्यटकांना किल्ल्यात प्रवेश बंद होता. माञ महिनाभरापासुन पर्यटकासाठी हा किल्ला खुला  करण्यात आला आहे.

 सोलापूर येथील युनिटी मल्टिकाँन्स कंपनीने पुरातत्व खात्याशी सामंजस्य करार करून किल्ल्यात मोठ्या प्रमाणात  विकास कामे केली आहेत. यामुळे किल्ला परिसर आधिकच सुशोभित झाला आहे. किल्ल्यात इ. स. १३ व्या शतकात तत्कालीन निजाम शासकाने  बोरी नदी किल्ल्यात वळवून त्यावर मोठा बंधारा बांधून त्यावर दोन धबधबे बांधून नदीचे पात्रातील अतिरिक्त पाणी याच दोन्ही धबधब्यातून वाहून जाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.

नुकत्याच झालेल्या पावसाने बोरी नदीलाही चांगलेच पाणी आले आहे. शिवाय बोरी धरण ही पूर्ण क्षमतेने भरले आहे. त्यामुळे सध्या नर-मादी धबधब्यातून पाणी वाहण्यास प्रारंभ झाला आहे. स्थापत्य कलेचा उत्कृष्ट नमुना असलेला हा किल्ला पर्यटकांचे आकर्षणाचा केंद्रबिंदु आहे. माञ गत वर्षी कोरोणामुळें  किल्ला पाहाता आले नाही. धबधबा कधी सुरु होईल यांची अतुरतेने वाट  पाहणा-या पर्यटकांना यंदा हा नरमादी धबधबा बघता येणार आहे.

   नळदुर्ग शहराच्या उत्तर बाजूने वाहत येणारी बोरी नदी किल्लयाचा आत येऊन तिला चंद्रकोरीचा आकार देऊन पुन्हा उत्तरेकडे वळविली आहे. पूर्व-पश्चिम असा हा बंधारा अतिशय कल्पकतेने परंतु भक्कम अशा तर्हेने बांधलेला आहे. बंधार्याच्या वरच्या बाजूला नदीच्या पुराचे पाणी वाहून जावे म्हणून दोन भले मोठे सांडवे तयार करण्यात आले आहेत. या दोन सांडव्याना नर व मादी अशी नावे देण्यात आलेली आहेत. नर-मादी धबधबतील पाणी पुढे 100 फूटापेक्षा अधिक खाली खोल जाऊन आदळते. ते सुंदर व विहंगम दृश्य पाहताना अक्षरश: डोळ्यांचे पारणे  फिटते.

 
Top