17 सप्टेंबर हा दिवस हैदराबाद मुक्तिसंग्राम दिन म्हणून साजरा केला जातो. स्वातंत्र्य सैनिकांच्या प्रदीर्घ लढ्यानंतर हैदराबाद मुक्तिसंग्रामाची परिणती 1948 मध्ये भारत सरकारने निजाम संस्थानविरुद्ध पोलीस कारवाई करुन हैदराबाद संस्थान स्वतंत्र भारत देशात सामावून घेतेले.
17 सप्टेंबर 1948 रोजी हैदराबाद राज्य निजामापासून मुक्त केले गेले.
स्वातंत्र्यपूर्व काळात हिंदुस्थानात जवळपास 600 लहानमोठी संस्थाने होती. संस्थानिकांना अंतर्गत कारभारात कमीअधिक स्वायत्तता होती. 1947 च्या स्वातंत्र्य कायद्यानुसार भारत स्वतंत्र होताच त्यांच्यावरील इंग्रजी सार्वभौमत्व संपुष्टात आले आणि तत्त्वतः त्यांना ब्रिटिश साम्राज्यात सामील होण्यापूर्वीचा त्यांचा दर्जा प्राप्त झाला. तथापि बदलत्या परिस्थितीत आपले स्वतंत्र अस्तित्व टिकविणे अशक्य आहे, याची जाणीव अनेक संस्थानिकांना होती.
संस्थानांचे भारतात विलीनीकरण करून तेथे लोकशाही व्यवस्था निर्माण करण्यासाठी अनेक संस्थानांमध्ये जनतेची आंदोलने चालू होती. हैदराबाद संस्थानात तेथील हैदराबाद स्टेट काँग्रेसने भारतात विलीन होण्यासाठी आणि लोकनियुक्त शासन स्थापन करण्यासाठी शांततामय लढा उभारला होता.
विलीनीकरणासंबंधीच्या वाटाघाटी लांबवून आपले स्वतंत्र राज्य स्थापन करण्याचा निजामाचा बेत होता. संस्थानात एकीकडे इत्तेहादुल् मुसलमिन या संघटनेने कासिम रझवीच्या नेतृत्वाखाली रझाकारांची सशस्त्र संघटना उभी करून हिंदूंवर अनन्वित अत्याचार सुरु केले होते. तेव्हा शांतता व सुव्यवस्था निर्माण करण्यासाठी भारत सरकारने तेथे सैन्य पाठवून ‘पोलीस कारवाई’ करण्याचा निर्णय घेतला. संस्थानातील जनतेने भारत सरकारच्या या अॅक्शनचे स्वागतच केले. पोलीस कारवाईला निजामाचा फारसा विरोध झाला नाही. परिणामी भारत सरकारने निजामाची शरणागती मिळविली व संस्थान खालसा केले. तो दिवस मराठवाडा मुक्ती दिन म्हणून साजरा केला जातो. 15 ऑगस्ट 1947 रोजी इंग्रजांची राजवट संपली आणि भारतास स्वातंत्र्य मिळाले. 17 सप्टेंबर 1948 रोजी हैदराबाद राज्य निजामापासून मुक्त केले गेले. 1 नोव्हेंबर 1956 सालात भाषावार प्रांत रचनेनंतर मराठवाडा विभाग मुंबई राज्यास जोडण्यात आला. 1 मे 1960 पासून मराठवाडा हा महाराष्ट्र राज्याचा भाग झाला.
स्वातंत्र्यापूर्वी मराठवाडा प्रदीर्घ काळ निजामाच्या हैदराबाद संस्थानचा भूभाग होता. भारतीय स्वातंत्र्य लढ्याच्या बरोबरीनेच हैदराबाद मुक्तीसंग्राम लढला गेला. स्वामी रामानंद तीर्थ, गोविंदभाई श्रॉफ हे हैदराबाद मुक्तीसंग्रामाचे अर्ध्वयू होते. स्वामी रामानंद तीर्थ (व्यंकटेश भवानराव खेडगीकर) हे संन्यासी व हैदराबाद मुक्तिसंग्रामाचे नेतृत्व करणारे मराठी चळवळकर्ते होते. स्वामी रामानंद तीर्थ यांचे समर्थक गोविंदभाई श्रॉफ यांनी हैदराबाद मुक्तिसंग्राम चळवळीत मोलाचे कार्य केले. मराठवाडा मुक्तिसंग्रामात ज्या ज्ञात-अज्ञात स्वातंत्र्यवीरांनी आपल्या प्राणांची आहुती दिली त्या सर्व स्वातंत्र्यवीरांना मानाचा मुजरा व सर्व मराठवाडावासीयांना हैदराबाद मुक्तिसंग्राम दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.
उमाजी गायकवाड
पत्रकार