हुतात्मा गणपतराव देशमुख (काटीकर )



 15 ऑगस्ट 1947 रोजी बिटीशांच्या जुलमी जोखडातून भारताला स्वातंत्र्य मिळाले तरी संस्थानिकांनी व्यापलेला बराच मोठा भूभाग पारतंत्र्यातच होता.हैद्राबाद,काश्मिर,जुनागढ यासारख्या जवळपास सहाशे छोट्या मोठ्या संस्थानांचा प्रदेश इंग्रजांच्या धुर्तनितीमुळे भारतीय संघराज्यात विलीन झाला नव्हता,लाॅर्ड माऊंट बॅटन योजनेनुसार 15 ऑगस्ट 1947 लाख खऱ्या अर्थाने भारताचा दोन तृतियांश भाग स्वतंत्र झाला होता. इंग्रजांनी भारतीय संस्थानिकांसमोर हिंदुस्थानात व पाकिस्तानात विलीन होण्याच्या पर्यायाबरोबरच स्वतंत्र राहण्याचा पर्याय ठेवला.



या पर्यायामुळे हैद्राबाद, काश्मिर, जुनागढच्या संस्यानिकांनी स्वतंत्र राहण्याचा पर्याय स्विकारला.मात्र या तिन्ही संस्थानातील जनतेची इच्छा भारतात विलीन होण्याची असल्यामुळे त्यांनी प्रचंड उठाव केला.त्यामुळे काश्मिर व जुनागढ ही संस्थाने थोड्याफार प्रतिकारानंत्तर लवकरच भारतात विलीन झाली.परंतु हैद्राबाद संस्थानाच्या बाबतीत तसे नसेल घडता तेथील जनतेला सतत तेरा महिने निजामाच्या जुलमी राजवटीविरूद्ध निकराचा लढा द्यावा लागला.हैद्राबाद संस्थानातील जनतेने भारतात विलीन होण्यासाठी जोरदार लढा सुरूच ठेवला.या चळवळीला पंडित जवाहरलाल नेहरु,वल्लभभाई पटेल,स्वामी रामानंद तीर्थ, गोविंद भाई श्राॅफ,दविसिंह चौहान, विनायकराव विध्यालंकार,भाई उध्दवराव पाटील,दिगंबरराव बिंदु, काटीचे गणपतराव ऊर्फ गणेशराव देशमुख,नरसिंगराव देशमुख यांनी स्वतंत्र होण्यासाठी हैद्राबाद संस्थानातील जनतेला प्रोत्साहन दिले.


 गणपतराव देशमुख भूमिगत राहून स्वातंत्र चळवळीला प्रोत्साहन देत होते.गणपतराव देशमुखांनी सातवी पर्यंतचे शिक्षण तुळजापूर येथे प्राविण्य मिळवून पूर्ण केले.त्यांनी गुप्त पणे गावातील व शेजारी गावातील तरुणांना हैद्राबाद मुक्तिसंग्राम विषयी मार्गदर्शन केले.त्यांच्या विचारांच्या प्रभावाने बाबुराव साळुंके काटी, हिराचंद विभुते काटी,जनार्दन यशवंत पाटील देगाव,सोपान मारुती भोसले, दत्तु कृष्णाथ जाधव,चंद्रकांत तात्यासाहेब जाधव धामणगाव,किसन निवृत्ती भोसले राळेरास इ.तरूणांना हैद्राबाद मुक्तिसंग्रामात भाग घेण्यासाठी मार्गदर्शन केले.1947- 48 साली हैद्राबाद संस्थानात मोठा दुष्काळ पडला होता.त्यावेळेस तुळजापूर तालुक्यातील बरीच लेवी जमा होत असे.काटी भागातील लेवी गणपतराव देशमुखांच्या ताब्यात होती.त्या लेवीचा उपयोग गणपतरावांनी उपाशी पोटी असलेल्या जनतेला वाटण्यासाठी केला.ज्वारीचे अंबार खुले केले व गोरगरीब जनतेची उपासमार थांबविण्यासाठी मदत केली.याचाही राग निजामाला होता.या सर्व गोष्टींचा परिणाम रझाकारावरती झाला व त्यांनी  गणपतराव देशमुख यांचा काटा काढण्याचे ठरविले.



 रझाकार चळवळीमधे लातूर भागातील कांही हिंदू लोकही रझाकार मध्ये सामील झाले होते. या सर्व रझाकारांनी गणपतराव देशमुखांना जिवे मारण्याचा कट केला.याची कल्पना गणपतरांना असल्या कारणाने 30 एप्रिल 1948 ला आपला मुलगा शिवाजीराव देशमुख यांच्याबरोबर जेवत असतांना ते मुलाला म्हणाले "एक ना एक दिवस मला मल्लप्पा धनशेट्टी सारखे हुतात्मा व्हावे लागेल"ही जणू त्यांना मिळालेली पूर्वसूचनाच असावी.दि.4 व 5 मे च्या मध्यरात्री 2 वाजण्याच्या सुमारास  घरी झोपलेल्या ठिकाणी रझाकारांनी गणपतराव देशमुखावरती गोळ्या झाडल्या व त्यांचा खून केला.ते भारत देशासाठी हुतात्मा झाले.
 हुतात्मा गणपतराव आनंदराव देशमुख यांचा खून झाला त्यावेळेस शिवाजीराव गणपतराव देशमुख (बंकलगीकर) त्यांचे दोन नंबरचे चिरंजीव वय वर्ष 16 हे एकटेच त्यांच्याजवळ होते.त्यांनी धीर करुन या संकटाला तोंड दिले.हा खून करण्यामध्ये वाशी जि उस्मानाबाद येथील करोडगिरी नाक्याचे मुख्य  नाकेदार सामील असल्याचे समजल्याबरोबर बळवंतराव कवडे देशमुख व विलासराव देशमुख यांनी त्या नाकेदाराला नाक्यात कोंडून तो नाका जाळून टाकला.


     लेखक माजी प्राचार्य जयसिंगराव देशमुख काटीकर
 
 
Top